सांगली / प्रतिनिधी
राज्यात कोविड-19 विषाणू ओमिक्रॉन हा प्रकार झपाट्याने वाढत असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात होणार प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश पारीत केले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडील 25 डिसेंबरच्या आदेशामध्ये बदल करून जिल्ह्यात 31 डिसेंबर रात्री नऊ वाजल्यापासून अतिरिक्त निर्बंध लागू केले आहेत.
लग्न, विवाह समारंभासाठी बंदिस्त किंवा खुल्या जागेत, जास्तीत जास्त 50 व्यक्तीनांच उपस्थित राहण्यास परवानगी असेल. इतर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अथवा धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील बंदिस्त किंवा खुल्या जागेत जास्तीत जास्त 50 व्यक्तींनाच उपस्थित राहण्यास परवानगी असेल. अंत्यविधी / अंत्ययात्रा बाबतीत उपस्थित व्यक्तींची संख्या 20 पर्यंत मर्यादित असेल. या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, तालुका कार्यकारी दंडाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व संस्थावर फौजदारी कारवाई करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे.