प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्ह्यातील 450 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. तब्बल 786 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. दि. 21 डिसेंबरला मतदान होत असून, मतमोजणी 22 डिसेंबरला होणार आहे. त्याकरता 22 नोव्हेंबरपासून ज्या गावची पोटनिवडणूक आहे तेथे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामपंचायत विभागातून देण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात रिक्त झालेल्या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणूका लागल्याची नोटीस दि. 22 नोव्हेंबरला प्रसिद्ध करणे, दि. 30 नोव्हेंबर ते दि. 6 डिसेंबर या कालावधीत अर्ज दाखल करणे, दि. 7 रोजी अर्जाची छाननी, दि. 9 रोजी चिन्ह वाटप, दि. 21 रोजी मतदान अन् दि. 22 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानंतर दि. 27 डिसेंबरला निवडणूकीची अधीसूचना जाहीर करणे असा कार्यक्रम आहे.
सातारा तालुक्यातील 58 ग्रामपंचायतीमध्ये 100 पदांसाठी, कराड तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीमध्ये 74 पदांसाठी, पाटण तालुक्यातील 90 ग्रामपंचायतीमध्ये 141 पदांसाठी पोटनिवडणूक होत आहे. कोरेगाव तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीमध्ये 70 पदांसाठी पोटनिवडणूक होत आहे. वाई तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीमध्ये 57 पदांसाठी पोटनिवडणूक होत आहे. खंडाळा तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीसाठी 19 रिक्तपदासाठी, महाबळेश्वर तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीमध्ये 99 पदांसाठी, फलटण तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीमध्ये 23 पदांसाठी पोटनिवडणूक होत आहे. तर जावली तालुक्यातील 67 ग्रामपंचायतीमध्ये 128 पदांसाठी पोटनिवडणूक होत आहे. माण तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींसाठी 15 जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. खटाव तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींसाठी 59 जागांसाठी अशी जिल्ह्यात 450 ग्रामपंचायतीमध्ये 786 जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे.