सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये स्वच्छ आणि निर्मळ असे पाणी मिळावे, अशी धारणा प्रत्येकाची असते. त्यानुसार ज्या-ज्या गावांमध्ये असा पाणी पुरवठा केले जात आहे. त्या गावांना दरवर्षी पाण्याची तपासणी करुन ग्रीन, रेड, यलो अशा तीन रंगाचे कार्ड दिले जाते.
सातारा जिल्ह्यातील सलग पाच वर्ष ग्रीन कार्ड असलेल्या 1419 ग्रामपंचायतींना चंदेरी प्रमाणपत्र देवून स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सन्मानित करण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सहीचे आहे. त्यामुळे प्रथमच स्वच्छ पाणी पुरवठा केल्याबाबत ग्रामपंचायतींचे कौतुक होणार आहे.
सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व आरोग्य विभागाच्यावतीने दरवर्षी गावोगावच्या पाणी पुरवठा योजनांचे पाण्याचे नमुने तपासण्यात येतात. या नमुन्याच्या अहवालानुसार त्या त्या गावांना आरोग्य विभागाकडून ग्रीन, यलो आणि रेड अशा प्रकारचे कार्ड देण्यात येते. यावर्षी जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून ज्या ग्रामपंचायतींनी सलग पाच वर्ष चांगल्या पद्धतीचा पाणी पुरवठा केला आहे. त्यानुसार यावर्षी सातारा जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना चंदेरी प्रमाणपत्र देवून गौरव करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी घेतला. त्यानुसार दि. 13 रोजीच ही प्रमाणपत्रे जिह्यातील ग्रामपंचायतींकडे पाठवण्यात आली असून स्वातंत्र्यदिनी त्या त्या गावांमध्ये अधिकाऱ्यांमार्फत ग्रामपंचायतींच्या सरपंचांकडे प्रदान करण्यात येणार आहेत. त्यामध्ये सातारा तालुका 189 ग्रामपंचायती, कोरेगाव तालुका 137 ग्रामपंचायती, खटाव 118 ग्रामपंचायती, माण 86 ग्रामपंचायती, फलटण 124 ग्रामपंचायती, वाई 97 ग्रामपंचायती, जावली 118 ग्रामपंचायती, महाबळेश्वर 79 ग्रामपंचायती, कराड 185 ग्रामपंचयाती, पाटण 230 ग्रामपंचायती अशा जिल्ह्यातील 1496 ग्रामपंचायतींपैकी 1419 ग्रामपंचायतींचा सन्मान उद्या करण्यात येणार आहे.









