सावंतवाडी/प्रतिनिधी-
सावंतवाडी वेंगुर्ले मालवण नगरपालिकेवर बुधवारपासून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या नगरपरिषदेची कार्यकारिणीची मदत संपल्याने प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. गुरूवारपासून प्रशासक नगरपरिषदेचा कार्यभार सांभाळणार आहे. नगरविकास खात्यामार्फत जिल्हा नगर विभागाला तसे आदेश प्राप्त झाले आहेत. या नगरपरिषदांची निवडणूक 2017 ला झाली होती. त्यात थेट नगराध्यक्ष निवडणूकीत सावंतवाडी नगरपालिकेवर बबन साळगांवकर यांची नगराध्यक्ष म्हणून निवड झाली होती. मात्र 2019 ला विधानसभा निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे सच्चिदानंद उर्फ संजू परब हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते.
त्यामुळे सावंतवाडी नगरपालिकेवरची सेनेची सत्ता संपुष्टात आली होती. वेंगुर्लेत भाजपचे दिलीप गिरप तर मालवणात सेनेचे महेश कांदळगावकर थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. नगरपरिषद कार्यकारणी चा कार्यकाल उद्या संपत आहे मात्र कोरोनामुळे निवडणूक लागल्या नाहीत. त्यामुळे प्रशासनाची नियुक्ती करण्यात आली आहे.









