अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार, 18 जुलै 2021, सकाळी 11.00
● शनिवारी अहवालात 821 बाधित ● एकूण 11,757 जणांची तपासणी ● पॉझिटिव्हिटी दराचा उल्लेखच नाही ● जिल्हात 2,915 बेड रिक्त ● दुसरी संपेना तिसरीची तयार
सातारा / प्रतिनिधी :
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या कडाक्यात जिल्हा कोलमडून पडला. रुग्णांची वाढती संख्या, बेडसाठी झालेली प्रचंड यातायात आणि त्यातच आकडेवारीचा झालेला घोटाळा त्यामुळे रुग्ण संख्येवर जिल्ह्यावर लॉकडाऊन लादला गेला आणि त्यानंतर बाधित वाढीचा वेग कमी झालेला आहे. मात्र तो गेले दीड महिने तीन अंकी संख्यावर स्थिर असून, यामध्ये सातारा कराडमध्ये अद्यापी चिंतेचे वातावरण आहे. दोन दिवसापूर्वी बैठकीत प्रशासनाकडून लॉकडाऊन आणखी शिथिल करण्यात येईल, अशी आशा नागरिकांना होती. मात्र, प्रशासन अद्यापही ढिम्म आहे, अशीच नागरिकांची भावना झालेली आहे. सध्यातरी जिल्ह्याची परिस्थिती गेले दोन महिने जशी होती तशीच असून, तीन अंकी बाधित वाढीचा रतीब दैनंदिन सुरूच आहे.
जिल्ह्याची स्थिती जैसे थे!
दरम्यान, शनिवारी रात्री आलेल्या अहवालानुसार 821 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यात 11,757 जणांच्या तपासण्या झालेले आहेत. आरटीपीसीआर टेस्टिंगचा पॉझिटिव्हिटी दर किती आहे हे अहवालात नमूद करण्यात आलेली नाही फक्त किती तपासण्या झाल्या व किती बाधित आले एवढाच उल्लेख आहे.
दुसरी संपेना तिसरीची तयारी
गुरुवारच्या आकडेवारीनुसार निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी प्रशासनाची बैठक झाली. मात्र त्या बैठकीत प्रशासनाकडून आम्ही तिसऱ्या लाटेला रोखण्याची तयारी करत असल्याचे सांगण्यात आले. तिसरीला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आणि त्यासाठी दक्ष राहा असे आवाहन करण्यात आले. मात्र सद्यस्थितीत जिल्ह्यातील दुसरी लाट संपेना थांबेना आणि प्रशासन तिसऱ्या लाटेसाठी सज्ज होत आहे ? हा अजब प्रकार जिल्हावासिय अनुभवताहेत.
वरून लॉकडाऊन, आतून बऱ्यापैकी सुरू
गेल्या वर्षभरापासून सातत्याने लॉकडाऊन सुरु आहे. काही महिने सोडले तर पुन्हा पुन्हा लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रावर त्याचा विपरित परिणाम झालाय. ज्यांचे हातावरचे पोट आहे अशी हजारो माणसे लॉकडाऊन कधी एकदाचा संपतोय म्हणून वाट पहात आहे. कारण त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होवू लागला आहे. या स्थितीत सध्या लॉकडाउन सुरू असला तरी सकाळी नऊ ते दोन या वेळेत सर्व प्रकारची दुकाने सुरू असतात. व्यापाऱ्यांना देखील आता लॉकडाऊन नको आहे. आर्थिक घडी विस्कटली आणि आता कोणीही ऐकण्याच्या स्थितीत नाही.
महाबळेशर सावरलाय, पण अद्याप लॉक
महाबळेश्वर तालुक्यातील बाधित वाढीचा वेग मोठया प्रमाणात खाली घसरला आहे. तर इतर वाई, फलटण, जावली, पाटण, खटाव, माण, कोरेगाव, खंडाळा तालुके चांगलेच सावरले आहेत. या तालुक्यातील वाढ दोन अंकावर आली असून यामध्ये महाबळेश्वर तालुक्याला चांगला दिलासा लाभला आहे. विषय राहिला आहे तो फक्त सातारा व कराड तालुक्यांचा. कराडमध्ये पुन्हा कोरोनाने हाहाकार सुरु केला असून यातून सावरण्यासाठी या दोन्ही तालुक्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. महाबळेश्वरवाशीयांनी लॉक डॉऊन शिथील करावा करावा, अशी मागणी तीन दिवसांपूर्वीच केलेले आहे मात्र त्यांचा राहू दे, जिल्ह्याच्या लॉकडाऊन बाबत प्रशासन निर्णय घेऊ शकलेले नाही.
जिल्हय़ात 2,915 बेड रिक्त
जिल्हयात विविध कोव्हिड हॉस्पिटलमध्ये 4 हजार 823 बेड असून यामध्ये 1 हजार 908 रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. त्यामुळे 2 हजार 915 बेड रिक्त असून यामध्ये 1,993 ऑक्सिजन बेड रिक्त असल्याचा दिलासा आहे. आयसीयू व्हेंटीलेटर बेड 108, आयसीयू व्हेंटीलेटरविना बेड 243 तर ऑक्सिजन विना 571 एवढे असे 2,915 बेड जिल्हय़ात रिक्त असल्याने बेडसाठी होणारी पळापळ थांबली आहे.
शनिवारी जिल्ह्यात बाधित 878, मृत्यू 14, मुक्त 885
शनिवारपर्यंत जिल्ह्यात एकूण नमूने 12,50,840, एकूण बाधित 2,07,770, एकूण कोरोना मुक्त 1,95,074, मृत्यू 5,014, उपचारार्थ रुग्ण 9,547