अचूक बातमी “तरुण भारत” ची, बुधवार 4, ऑगस्ट, सकाळी 10.00
●जिल्ह्यात रूग्णवाढ घटतेय ● गेल्या 24 तासात 618 नवे बाधित ●28 जणांचा मृत्यू ●12 हजार 357 चाचण्या ●पॉझिटिव्हीटी वाढू न देणे जिल्हावासियांच्या हातात
प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यात गेल्या चार दिवसात कोरोना रूग्णवाढ कमालीची घटली आहे. कराड, सातारा, फलटण तालुक्यात रूग्णवाढीचा आलेख कमी होत आहे. पाटण, महाबळेश्वर, वाई, कोरेगांव, जावली, खंडाळा तालुक्यात रूग्णवाढ 50 च्या खाली आली आहे. रूग्णवाढीचा हा दिलासा जिल्हावासियांना आहे. त्यामुळे बुधवारी जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 5 पर्यंत खाली घसरला. मात्र, वातावरणातील सातत्याने होणारा बदल आणि पावसाचा येण्या जाण्यामुळे जिल्ह्याच्या काही भागात डेंग्यू, चिकणगुणियाचे रूग्ण वाढू लागला आहेत. या दोन्ही आजारातही ताप, थंडीची लक्षणे असल्याने कोरोना टेस्ट करूनच पुढील उपचार करावे लागत आहेत. दरम्यान जिल्ह्यात गेल्या 24 तासात 12 हजार 357 संशयितांच्या चाचण्या झाल्या असून 618 नवे रूग्ण वाढले आहेत.
नियम पाळल्यानेच जिल्ह्यात दिलासादायक स्थिती
जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात रूग्णवाढीचा आलेख कमी होत आहे. हजारांच्या अवतीभोवती असणारी रूग्णवाढ आता सहाशे ते पाचशेच्या आसपासपर्यंत कमी आलेली आहे. त्या तुलनेत कोरोनामुक्ती वाढली आहे. जिल्हावासियांनी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतरही नियमांचे पालन केल्याने रूग्णवाढीत घट होऊ लागली आहे. प्रशासनासह जिल्हा आरोग्य यंत्रणेने वाढवलेले चाचण्यांचे प्रमाण आणि ट्रेसिंगची गती यामुळे रूग्णवाढीत घट होऊ लागली आहे.
डेंग्यू, चिकणगुणियाने रूग्ण बेजार
कोरोनाच्या विळख्यातून जिल्हा कसाबसा सावरत असतानाच जिल्ह्याच्या कराड, सातारासह इतर भागात डेंग्यू, चिकणगुणियाचे रूग्ण वाढत आहेत. याची दखल घेऊन नगरपालिकांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. रूग्णवाढ वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने नगपालिका, ग्रामपंचायतींना सुचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्यात जनजागृती सुरू असून नागरिकांनीही प्रशासनाच्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
मंगळवारी जिल्हय़ात एकूण बाधित 618, एकूण मुक्त 1253, एकूण बळी 28
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमुने – 1436876, एकूण बाधित – 221562, घरी सोडलेले -208338, मृत्यू – 5355, उपचारार्थ रुग्ण-10562









