प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना काळात इचलकरंजीमध्ये सामुहिक प्रार्दुभाव झाल्याने जुलैमध्ये सीपीआरमधील जिल्हा शल्य चिकित्सकांचे मुख्यालय इचलकरंजीला हलवले हेते. आता कोरोना रिकव्हरी रेट 92 टक्क्यांवर आल्याने जिल्हा शल्य चिकित्सकांचे इचलकरंजीतील मुख्यालय तीन महिन्यांनी पुर्ववत `सीपीआर’मध्ये हलवले आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱयांनी संबंधितांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.
कोरोना काळात तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांसंदर्भात तकारी वाढल्या होत्या. ते जिल्ह्याचे नोडल अधिकारी हेते. तरीही इचलकरंजी शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला, कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या वाढली. त्यामुळे तेथील आयजीएम हॉस्पिटल कोरोना रूग्णांसाठी आरक्षित करण्यात आले. या 100 बेडच्या हॉस्पिटलवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांना मुख्यालय इचलकरंजीत हलवण्याचे आदेश दिले. पण जिल्हा शल्य चिकित्सकांनी कार्यालयाशी निगडीत अन्य 40 जणांच्या स्टाफला इचलकरंजीत हजर होण्याचे आदेश दिले. त्यातून जिल्हा शल्य चिकित्सक आणि स्टाफमध्ये तणाव निर्माण झाला. जिल्हा शल्य चिकित्सकांबद्दल वरिष्ठांपर्यत तक्रारी झाल्या. शल्Îचिकित्सक डॉ. केम्पीपाटील यांच्यावर बदलीची टांगती तलवार होती.
दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. केम्पीपाटील यांची सातारा सिव्हील हॉस्पिटलमध्ये बदली झाली. त्यांच्या जागी तासगाव ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक डॉ. अनील माळी यांची नियुक्ती झाली. त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर आठच दिवसांत जिल्हाधिकारी देसाई यांनी मुख्यालय सीपीआर हॉस्पिटलमध्ये पुर्ववत नेण्याचे आदेश दिले. त्यानंतर सोमवारी आयजीएम हॉस्पिटलमधील उर्वरीत स्टाफही सीपीआरमध्ये परत आला आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या बदलीनंतर नवे जिल्हा शल्य चिकित्सक येताच 15 दिवसांत मुख्यालय सीपीआरमध्ये आल्याने समाधान व्यक्त होत आहे.