स्पिरिटची बाटली हस्तगत : डॉ. सुभाष चव्हाण यांच्याकडून चौकशी
प्रतिनिधी/ सातारा
दोन दिवसांपूर्वी सातारा जिल्हा ग्रामीण रुग्णालयातून पाय फुटलेल्या दोन स्पिरिटच्या बाटल्यापैकी एक बाटली हस्तगत करण्यात जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांना यश आले असून या घटनेप्रकरणी त्यांनी रुग्णालयातील मुकादम व मुख्य फार्मासिस्ट यांना चांगलेच धारेवर धरले. रुग्णालयातील औषध भांडारमधून या स्पिरिटच्या बाटल्या बाहेर आल्या नसल्याचे मुख्य फार्मासिस्ट छातीठोकपणे सांगत असल्यामुळे संशयाची सुई मात्र मुकादमाकडे वळत असल्याचे स्पष्ट होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी दि. 24 रोजी सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातून सेवानिवृत्त झालेल्या एका कर्मचायाने रुग्णालयातून दोन स्पिरिटच्या बाटल्या खिशातून घेऊन गाडीच्या डिगीमध्ये ठेवून सेवानिवृत्त झालेला संबंधित कर्मचारी पुन्हा रुग्णालयात निघून गेला. ही घटना काही जागृक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या नागरिकांनी ही बाब दुचाकी गाडीच्या नंबरसह माध्यमांच्या प्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिली.
माध्यमांनी ही घटना जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांना सांगितले असता त्यांनी संबंधित ऍक्टिव्हा गाडीवर लक्ष ठेवून त्याच्या चालकाची विचारपूस करण्यासाठी माझ्या केबिनमध्ये घेऊन या अशा सूचना सुरक्षारक्षकांना केल्या होत्या. तोपर्यंत सुभाष चव्हाण यांनी रुग्णालयातील भांडार गृहातील मुख्य फार्मासिस्ट आणि रुग्णालयातील मुकादम यांना आपल्या केबिनमध्ये पाचारण केले.
चव्हाण यांनी संबंधितांना घडलेल्या घटनेची माहिती दिली असता फार्मासिस्ट याने भांडार गृहातून मी कोणालाही स्पिरीटच्या बाटल्या दिल्या नाहीत असे छातीठोकपणे सांगितले. त्यामुळे संशयाची सुई आपोआपच मुकादमाकडे वळाली. मिळालेल्या माहितीनुसार व्हिसेरा थिकं करण्यासाठी दिवा पेटवण्यासाठी स्पिरीटचा वापर केला जातो. दरम्यान संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱयाला सुरक्षारक्षकांनी सुभाष चव्हाण यांच्या पुढे उभे केले असता त्याने एक स्पिरटची बाटली काढून दिल्यानंतर डॉ. चव्हाण यांनी मुकादमसह फार्मासिस्टची चांगलीच कान उघाडणी केली.
जिल्हा रुग्णालयात मास्कची वानवा ?
सातारा जिल्हा रुग्णालयात सध्या बहुतांश वैद्यकीय अधिकारी व कर्मचायांच्या नाकाला कापडी मास्क लावल्याचे दिसून येत आहे. याबाबत आज माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता रूग्णालयात दर्जेदार मास्क उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. अद्यापही जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अनेक वैद्यकीय अधिकारी कर्मचारी नर्सेस आपल्या जीवावर उदार होऊन कोरोना बाधित व्यक्तींवर उपचार करीत असताना जिल्हा रुग्णालयात दर्जेदार मास्क नसल्याचे सांगण्यात येते ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे समजली जाते.









