‘कोरोना’बाधित रुग्णाच्या कुटुंबातील सहाजणांचा समावेश : वायंगणीत सीमा सील, वेंगुर्ले शहर बफर झोनमध्ये : सर्व आस्थापने बंद : आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण
प्रतिनिधी / वेंगुर्ले:
वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी येथील 27 वर्षीय युवक मुंबई येथे आंबा वाहतुकीसाठी चालक म्हणून जाऊन आल्यानंतर त्याचा ‘कोरोना’ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वायंगणी, खानोली, तळेकरवाडी पंचक्रोशीत विशेष दक्षता घेण्यात आली आहे. वेंगुर्ले शहर बफर झोनमध्ये येत असल्याने वेंगुर्ले शहरातील सर्व आस्थापने पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. वेंगुर्ले शहर तसेच वायंगणी परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सीमा बंद करण्यात आल्या आहेत. ‘कोरोना’बाधित रुग्णाच्या कुटुंबातील सहाजणांसह दोन चालक व मालक अशा नऊजणांना ओरोस जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.
वेंगुर्ल्यात ‘कोरोना’बाधित रुग्ण आढळल्यावर वेंगुर्ल्यात प्रशासकीय यंत्रणा अधिकच सतर्क झाली आहे. बुधवारी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, वेंगुर्ले पोलीस निरिक्षक तानाजी मोरे, तहसीलदार प्रवीण लोकरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर, ग्रा. पं. विस्तार अधिकारी उमा पाटील, मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी वायंगणी भागाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत वायंगणी सरपंच सुमन कामत, ग्रामसेवक संदीप गवस, तलाठी नीलम चव्हाण, ग्राम कृती समिती सदस्य आनंद दाभोलकर, माजी सभापती दीपक नाईक, आडेली वैद्यकीय अधिकारी डॉ. संजीवनी पाटील आदी उपस्थित होते.
संपर्कात आलेले जिल्हा रुग्णालयात
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, खानोली, वायंगणी, तळेकरवाडी हा भाग कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे येथे आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. आरोग्य विभागाची 15 पथके ठेवण्यात आली आहेत. या भागात एकूण 861 घरे आहेत. प्रत्येक पथकाला 50 घरांची जबाबदारी देण्यात आली आहेत. सकाळी 9 वाजल्यापासून या भागातील प्रत्येक वाडीत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ‘कोरोना’ पॉझिटिव्ह व्यक्तीच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यातील सहा व्यक्ती त्याच्या कुटुंबातील आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती 25 एप्रिलला आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली होती. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात ती तीन ते चार तास थांबली होती. संस्थात्मक विलगीकरणास ती तयार नव्हती. त्यानंतर ती व्यक्ती आडेलीत एकाच्या घरी गेली होती. त्यामुळे ती व्यक्ती कोणाकोणाच्या संपर्कात आली, याचाही सर्व्हे करण्यात येत असल्याचे डॉ. माईणकर यांनी सांगितले.
गाव कृती समितीतर्फे जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा
वायंगणी गावच्या तिन्ही वॉर्डच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गावातील लोक बाहेर जाऊ शकणार नाहीत. अथवा बाहेरचे लोक गावात येऊ शकणार नाहीत. ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गाव कृती समितीने नेमलेल्या स्वयंसेवकांमार्फत जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे सरपंच सुमन कामत यांनी सांगितले.
पुढील आदेशापर्यंत शहरातील आस्थापने बंद
सिंधुदुर्ग जिल्हा ऑरेंज झोनमध्ये येत असल्याने 4 मेपासून येथील लॉकडाऊन नियमात थोडीफार शिथिलता आणण्यात आली होती. गेले दीड महिना 8 ते 11 या वेळेव्यतिरिक्त सुन्यसुन्या वाटणाऱया शहरात पाच मे रोजी थोडीफार वर्दळ सुरू झाली होती. मात्र, वेंगुर्ले-वायंगणी येथे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्यानंतर 6 मे पासून वेंगुर्ले शहर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे सर्व दुकाने, मेडिकल स्टोअर्स, मार्केट बंद करण्यात आले. फक्त तातडीच्या वैद्यकीय सुविधा सुरू राहणार आहेत. पुढील आदेश येईपर्यंत इतर सर्व आस्थापने बंद राहाणार असल्याचे नगरपरिषद मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी सांगितले.









