- चौकशी करून अहवाल सादर करण्याचे दिले आदेश
- उपाययोजनांबाबतचाही मागितला अहवाल
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हा रुग्णालयामध्ये ऑक्सिजन सिलिंडरमधील उच्चदाबाने वायू बाहेर आल्याच्या घटनेची जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी गंभीर दखल घेत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सकाना दिले आहेत. यानंतर अशा घटना घडू नये यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याचाही अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा रुग्णालयात स्फोटसदृश आवाज निर्माण झाल्याने रुग्णामध्ये घबराट निर्माण झाली होती. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी स्पष्टीकरण देताना जिल्हा रुग्णालय येथील ऑक्सिजन पुरवठा करणाऱया सेंट्रल ऑक्सिजन लाईन पुरवठा यंत्रणेला ऑक्सिजन सिलिंडर जोडताना कनेक्टर योग्य प्रकारे घट्ट न बसल्यामुळे भरलेल्या ऑक्सिजन सिलिंडरमधील उच्चदाबाने वायू बाहेर आल्याने मोठा आवाज झाला होता, तो आवाज स्फोटाचा नसल्याचे सांगितले.
जिल्हा रुग्णालयातील डेडीकेटेड कोविड सेंटरसाठी कार्यान्वित केलेली सेंट्रल ऑक्सिजन लाईन सिस्टीम आहे. त्यात दर तासाला 10 जंम्बो सिलिंडर असताता व ते जोडण्यासाठी मॅनिफोल्ड लावलेले असतात. 3 मे रोजी पहाटे दोन कनेक्टर जंम्बो सिलिंडर लावत असताना सुटून सिलिंडरमधील कंप्रेस्ड गॅस दाबामुळे एक मोठा आवज झाला. या आवाजामुळे सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्याचे वृत्त सर्वत्र पसरले आहे. पण, प्रत्यक्षात स्फोट झालेला नसून सेंट्रल ऑक्सिजन लाईन पुरवठा यंत्रणेला ऑक्सिजन सिलिंडर जोडताना कनेक्टर जोडताना योग्य प्रकारे न बसल्यामुळे गॅस उच्चदाबाने बाहेर आल्यामुळे मोठा आवाज झाला. ऑक्सिजन सिलिंडरमधील वायू हा अज्वलनशील असल्याने कोणतीही इजा, गुदमरणे व जीवित हानी, स्फोट असा कोणताही प्रकास घडला नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील स्पष्ट केले होते.
दरम्यान, या घटनेत सुदैवाने स्फोट झाला नाही किंवा जीवित हानी झाली नाही. असे असले तरी यापूर्वीही अशा घटना घडल्या होत्या. त्यामुळे भविष्यात काही गंभीर घटना घडू नये यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी झालेल्या घटनेची गंभीर दखल घेतली व त्या घटनेची सखोल चौकशी करून चौकशी अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिले आहेत. ऑक्सिजन सिलिंडर जोडताना यापुढे पूर्णपणे दक्षता घेण्यात यावी. अशा घटना घडू नये यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत? टेक्निशियनची व्यवस्था केली आहे का? याचाही अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत.








