3 हजाराहून अधिक टेस्टींगचे रिपोर्ट प्रलंबित
प्रतिनिधी/ सातारा
जिह्यात दररोज सहा हजार जणांचे स्वॅब तपासणीला घेतले जात आहेत. त्यामध्ये स्वॅब तपासणी करणाऱया यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. त्या ताणातूनच गेल्या तीन दिवसांपूर्वी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील आरटी-पीसीआर यंत्रणाच बंद पडली आहे. त्यामुळे घेण्यात आलेल्या स्वॅबचे नमुने पुणे, मुंबई येथे पाठवले जात आहेत. त्यामुळे तेथून रिपोर्ट येण्यास विलंब लागत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागत आहे. अशी अवस्था जिल्हा रुग्णालयातील आहे.
जिल्हा रुग्णालयामधील आरोग्य कर्मचारी गेल्या 13 महिन्यामध्ये प्रचंड तणावाखाली काम करताना दिसत आहेत. कोरोना बाधितांचे स्वॅब घेण्यासाठी असलेली यंत्रणा दिवसरात्र राबते आहे. त्यातूनच मशिनरीमध्ये तांत्रिक बिघाड झाला तर आणखी मिळवलेच. तसाच प्रकार गेल्या तीन दिवसांपूर्वी झाला आहे. त्यामध्ये रुग्णालयातील आरटी-पीसीआर लॅबमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे ती बंद असून तांत्रिक अडचणी दूर होण्यास अजून आठ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे घशातील स्रावांचे नमुने पुणे, मुंबईला पाठवावे लागत असल्याने त्यांचा अहवाल येण्यास विलंब लागत आहे. स्वॅब देणाऱयांचे जीव टांगणीला लागले आहेत. राज्यात कोरोना बांधितांच्या संख्येत सातारा जिल्हा टॉपला असून सातारा जिह्याचा पॉझिटिव्ह रेट 32.7 टक्के आहे. होम कॉरोन्टीन रुग्णांच्या निष्काळजीपणामुळे.. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आणि प्रशासनातील विस्कळीत नियोजनामुळे पॉझिटिव्ह रेटमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. सातारा जिह्यात सध्या 21 हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेत असून 75 टक्के रुग्ण गृह विलगिकरणात आहेत. वेळेत चाचणी अहवाल मिळाल्यास रुग्णांना लवकर उपचार घेता येतील आणि रुग्ण गंभीर स्थितीत जाण्यापासून लांब राहू शकणार आहे.
मशिन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु
तीन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयातील लॅबमधील यंत्रामध्ये बिघाड झाल्याने नमुने पुणे, मुंबईला पाठवण्यात येत आहेत. त्यामुळे घेतलेल्या नमुन्यांचे अहवाल मिळण्यास विलंब होत आहे.. स्वॅब टेस्ट करणाऱया मशिनमधून सर्वच स्वॅबचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असल्याने मशीन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.
नियोजन फिस्कटले टेस्टचा अहवाल पहायला सिव्हिललाच जावे लागते
टेस्टचे अहवाल मोबाईलवर एसएमएसद्वारे मिळणार नसून ज्या ठिकाणी स्वॅब दिले आहेत. त्या ठिकाणी जाऊन अहवाल पहावा लागणार आहे. त्यामुळे संशयित रुग्णांची घालमेल होताना दिसत आहे.. जिह्यात बधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हा रुग्णालयावर ताण वाढला असल्याने प्रशासनाने योग्य नियोजन करून जिल्हा लवकर कोरोनामुक्त करावा अशीच आशा व्यक्त केली जात आहे.








