जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचा विश्वास : जिल्हा बँकेची वार्षिक सभा आज
प्रतिनिधी / कणकवली:
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 38 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार 29 सप्टेंबर रोजी दु. 12 वा. ओरोस येथे शरद कृषी भवनमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या सभेला 1177 भागधारक संस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले. बँकेने यावर्षी भागधारक संस्थांना 15 टक्के लाभांश जाहीर केला आहे. कोविड काळातही जिल्हा बँकेच्या नफ्याच्या प्रमाणात वाढ झालेली असून ही बँक राज्यच नव्हे तर देशाच्या सहकार क्षेत्रात अग्रगण्य राहील, असे काम संचालक मंडळ करत आहे. त्यामुळेच कुणालाही बँकेवर आरोप करता आलेले नसून या पुढील काळातही करता येणार नाहीत, असे काम संचालक मंडळ करेल, असा विश्वासही सावंत यांनी व्यक्त केला.
जिल्हा बँकेच्या येथील शहर शाखेमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सावंत यांनी माहिती दिली. यावेळी संचालक आर. टी. मर्गज, बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे उपस्थित होते. बँकेचे सन 2020-21 चे ऑडिट झालेले असून बँकेला यावर्षीही अ दर्जा मिळाला आहे. बँकेला नाबार्डकडूनही अ दर्जाच मिळालेला आहे. बँकेचे संचालक मंडळ व प्रशासनाने, सहकारी संस्थांनी केलेल्या कामामुळे सातत्याने अ दर्जा मिळाला आहे. या कामगिरीच्या जोरावरच बँक राज्यात नावारुपाला आली असल्याचे सावंत म्हणाले.
अलिकडेच सातारा व अकोला बँकेकडून जिल्हा बँकेच्या कामकाजाची पाहणी केली व माहिती घेतली. जिल्हा बँकेने अधिकाराचे विकेंद्रीकरण करून शाखाधिकाऱयांना 15 लाखांपर्यंतच्या दिलेल्या मर्यादेचेही या दौऱयात कौतुक करण्यात आले. नाबार्डच्या 2020-21 च्या वैधानिक लेखा परीक्षणातही बँकेने अ दर्जा मिळविला. बँकेकडून सुमारे 40 टक्के शेतीकर्ज देण्यात आलेले आहे. 2292 कोटी ठेवी 20-21 मध्ये झालेल्या असून स्वनिधी 270 कोटींवर गेलेला आहे. येणाऱया आर्थिक वर्षात 5000 कोटींची उलाढाल बँकेच्या माध्यमातून करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
बँकेचा सीडीरेषो 67.92 झालेला आहे. बँकेला 62.92 लाख ढोबळ नफा व 14 कोटी निव्वळ नफा झालेला आहे. जिल्हा बँकेने काजू उत्पादक कंपन्यांना मदत, बँकेत सातबारा, आठ अ, नवीन डाटा सेंटरचे काम, गटसचिवांना विमा संरक्षण, कोविडमुळे अनाथ झालेल्या 11 मुलांना मदत, खावटी कर्जाबाबत प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न, वाहन खरेदीसाठी 9 टक्के दराने मंगलमूर्ती वाहन कर्ज योजना, तौक्ते व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱयांना 6 टक्के दराने पतपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. तसेच शैक्षणिक कर्जामध्ये विशेष श्रेणीसाठी 100 टक्के, प्रथम श्रेणी 75 टक्के, द्वितीय श्रेणी 50 टक्के व्याज परतावा देणार आहे. सभासद संस्थांना अभिमान वाटावा, असे काम बँकेच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे सावंत म्हणाले.
ही सभा कोविड नियम पाळून होणार आहे. सर्वसाधारण सभेला सर्व सभासद संस्था प्रतिनिधीनी उपस्थित रहावे. यावर्षी बँकेने 15 टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. यात गतवर्षी लाभांश देण्यास रिझर्व्ह बँकेकडून मान्यता नव्हती. त्यामुळे गतवर्षीचे 5 टक्के व यावर्षीचे 10 टक्के लाभांश दिलेला आहे. उर्वरित 5 टक्के लाभांशबाबत पुढील वर्षी विचार करण्यात येणार आहे. सीडी रेषो वाढीसाठीचा प्रयत्न सुरू आहे. संगणक प्रणाली, इंटरनेट, मोबाईल बँकिंग या सर्व सुविधा सुरू होतील. पुढील चार दिवसांत सीबीएस प्रणालीच्या माध्यमातून अधिक सुविधा चालू करण्याचा प्रयत्न आहे. बँक देशात अग्रगण्य ठरेल असे काम सुरू आहे, असेही सावंत म्हणाले.









