1964 मतदार बजावणार मतदानाचा हक्क
प्रतिनिधी / सातारा :
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 10 जागांसाठी उद्या (रविवारी) जिल्ह्यातील 11 केंद्रावर मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी सर्व मतदान केंद्रावर बॅलेट पेपर, शाई व इतर साहित्य, कर्मचारी, अधिकारी यांचे नियोजन केले आहे. रविवारी सकाळी 7.30 वाजता मतदानास प्रारंभ होणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेची मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी माळी यांनी सर्व नियोजन करुन इतर कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या. नियोजन केल्यानुसार शुक्रवारी सायंकाळीच जिल्ह्यातील 11 मतदान केंद्रावर सर्व साहित्य पोहोच केले. प्रत्येक मतदार संघासाठी वेगळय़ा रंगाचा बॅलेट पेपर आहे. सोसायटी मतदार संघासाठी पांढरी, महिला प्रवर्गाची गुलाबी, इतर मागास प्रवर्गाची पिवळी, नागरी बँका व पतसंस्थाची फिक्कट हिरवी अशा मतपत्रिका असणार आहेत.
जिल्ह्यात सातारा तालुक्यासाठी शासकीय तांत्रिक विद्यालय, जावली तालुक्यासाठी जिल्हा परिषद केंद्र शाळा मेढा, महाबळेश्वर तालुक्यासाठी शेठ गंगाधर हायस्कूल महाबळेश्वर, कराड तालुक्यासाठी शिवाजी हायस्कूल कराड, पाटण तालुक्यासाठी ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल पाटण, कोरेगाव तालुक्यासाठी केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 1 कोरेगाव, खटाव तालुक्यासाठी केंद्र हुतात्मा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज वडूज, माण तालुक्यासाठी केंद्र महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज दहिवडी, खंडाळा तालुक्यासाठी केंद्र जिल्हा परिषद शाळा खंडाळा, वाई तालुक्यासाठी केंद्र किसनवीर महाविद्यालय वाई आणि फलटण तालुक्यासाठी मुधोजी विद्यालय फलटण हे केंद्र असून या केंद्रावर कर्मचारी, अधिकारी आणि सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.