प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून मतदार यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. यामध्ये बँकेसाठी आलेल्या ठरावांवर 46 हरकती आल्या होत्या. त्यावर विभागीय सहनिबंधकांकडे सुनावणी झाली. विशेष म्हणजे खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांचे नावच मतदार यादीत नसल्याची हरकत घेतली होती. त्यावर सुनावणी पार पडली. त्याचा निकाल काय लागणार याकडे उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचे राजकारण आणखी तापणार आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादीची पक्कड कायम राहिली आहे. विद्यमान चेअरमन आमदार शिवेंद्रराजे हे जरी भाजपाचे आमदार असले तरीही राष्ट्रवादीच्याच गोटातून ते चेअरमन झाले होते. आता होणाऱ्या बँकेच्या निवडणूकीत त्यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या अनुषंगाने दि. 25 ऑगस्टपासून कामकाजास सुरुवात झाली. यापूर्वीच सातारा जिल्हा बँकेकडे 2 हजार 13 ठराव झाले होते. निवडणूकीची स्थगिती उठल्यानंतर बँकेने सर्व ठरावांची छाननी करुन प्रारुप यादी सहनिबंधक अरुण काकडे यांच्याकडे सादर केली होती. बँकेने छाननी केलेल्या ठरावामध्ये 70 ठराव हे वेगवेगळया कारणांमुळे बाद केले होते. राहिलेले 1963 मतदारांची प्रारुप मतदार यादी त्यानंतर जाहीर करण्यात आली होती. दि. 3 ते 13 सप्टेंबर या कालावधीत मतदार यादीवर हरकती व आक्षेप नोंदवण्यात आले. प्रारुप मतदार यादीवर 46 हरकती दाखल झाल्या. त्यामध्ये सोसायटी मतदार संघातून 26, खरेदी विक्री संघातून 1, नागरी बँका 7, गृहनिर्माण सोसायटी 6, औद्योगिक विणकर मजूर मतदार संघातून 5 हरकती दाखल झाल्या होत्या. यात खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी मतदार यादीतून नाव गायब झाल्याची हरकत घेतली होती. त्यावर सहनिबंधक काकडे यांच्यासमोर तब्बल दीड तास सुनावणी झाली. इतरही सुनावण्या पार पडल्या.निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे. पाच दिवसांचा कालावधी त्यासाठी लागणार आहे. प्रत्येक हरकतीवर झालेल्या सुनावणीनुसार निकालपत्रक तयार करत आहेत. हे काम अद्याप सुरु आहे. बुधवार दि. 22 रोजी सर्व हरकतींवर अंतिम निर्णय दिला जाणार आहे. याकडे हरकती घेणाऱ्यांसह जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.









