मंगळवारपासून मतदार यादीला प्रारंभ
प्रतिनिधी/ सातारा
शेतकऱयांची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीवरील स्थगिती उठली असून सहकार विभागाने निवडणूकीच्या कामाला प्रारंभ केलेला आहे. मंगळवारपासून प्रत्यक्ष मतदार यादीचा कार्यक्रम सुरु होणार आहे. हा कार्यक्रम महिनाभर चालणार आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सहकार विभाग आणि विकास सेवा सोसायटय़ा यांची चांगलीच ताराबंळ उडत आहे. एकूणच जिल्हा बँकेचे राजकारण आणि निवडणूक प्रक्रियाही चांगलीच रंगत येणार आहे.
सातारा जिह्यात अनेक पुरस्कार मिळवणारी आणि जिह्यातील शेतकऱयांची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱया जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत ही पंधरा महिन्यापूर्वीच संपली होती. परंतु कोरोनाच्या महामारीच्या कारणास्तव विद्यमान संचालक मंडळास मुदतवाढ देण्यात आली होती. निवडणूक घेण्याच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती पाच वेळा देण्यात आली होती. आताही 31 ऑगस्टपर्यंत स्थगिती होती. परंतु त्यापूर्वीच निवडणूका लवकरात लवकर घेण्याच्याही सुचना देण्यात आल्या होत्या. ज्या टप्यावर निवडणूका स्थगित केल्या होत्या तेथून पुढे कार्यक्रम घेण्यात यावा, असे सांगण्यात आले. त्यानुसार आता थेट मतदार यादीचाच कार्यक्रम सुरु होणार आहे. मार्च 2020 मध्येच जिह्यातील अनेक विकास सेवा सोसायटय़ाचे ठरावही करण्यात आले होते. हे ठराव जिल्हा बँकेकडे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने पाठवले होते. पडताळणी केली आहे. आता सरकारचा आदेश मिळताच पुन्हा मतदार यादीच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला आहे. हा कार्यक्रम महिनाभर चालणार आहे. दरम्यान, आधीच बँकेच्यावतीने विकास सोसायटयांच्यावर ताण आहे. त्यात संगणकीकरणाचे फॅड आणून पुन्हा बँकेच्या निवडणूकीच्या मतदार याद्यांचा बोजा पुन्हा सोसायटय़ांच्यावर पडला गेला आहे. त्यामुळे बँकेच्या निवडणूकीचे वातावरण तयार होवू लागले आहे.









