प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून या निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी जिल्हय़ातील शिवसेनेच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक साताऱयातील शासकीय विश्रामगृहात झाले. यावेळी झालेल्या चर्चेनंतर शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी जिल्हा बँकेची निवडणूक शिवसेना लढणार असल्याचे सांगितले.
या बैठकीस गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, प्रा. नितीन बानगुडे-पाटील, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, युवानेते धैर्यशील पाटील, शेखर गोरे, डी. एम. बावळेकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील मतदारसंघ निहाय सविस्तर चर्चा करण्यात आली. कच्ची मतदार यादी, उमेदवारांची वर्गवारी याबाबत चर्चेनंतर आपापल्या मतदारसंघात व कार्यक्षेत्रात कशा पध्दतीने निवडणुकीच्या अनुषंगाने काम करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हय़ातील सद्यस्थिती व काँग्रेससह इतर समविचारी लोकांची भूमिका यावर शिवसेनेची आगामी रणनिती ठरवण्याचे निश्चित करण्यात आले.
या बैठकीनंतर आम्ही लवकरच निवडणुकीचा आराखडा तयार करुन मुंबईमध्ये वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक आयोजित केली जाणार असून त्या बैठकीत पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेची जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत अधिकृत घोषणाही लवकरच करण्यात येईल असे प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.









