प्रतिनिधी / सातारा :
जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी सोमवारी दुपारी सहकार विभागाकडून
प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालय आणि जिल्हा बँकेमधील चेअरमन यांच्या केबीनमध्ये लावण्यात आली असल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, कधीही जिल्हा बँकेच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होवू शकतो. जिल्हा बँक आपल्याच ताब्यात ठेवायची यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व तयारी केली आहे तर इतर पक्षांची नुसतीच टंगळमंगळ सुरु आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठराविकच मंडळी मतदान करु शकतात. त्यामुळे मतांची बेरीज आपल्याच पक्षाची कशी जास्त होईल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून साखरपेरणी केली जात होती. मतदारांची संख्या आपली वाढेल अन् विरोधकांना मताचा सुद्धा अधिकार असणार नाही किंवा विरोधकांची मतदारांची संख्या कमी असेल यासाठी खटपटी सुरु होत्या. कोरोनामुळे निवडणूक प्रक्रिया सतत लांबणीवर जात आहे. तर नुकतेची जिल्हा बँकेची सोमवारी सायंकाळी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ती जिल्हा बँक आणि सहकार विभागाच्या कार्यालयात सांयकाळी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा बँकेतून देण्यात आली. दरम्यान, त्यामुळे आता निवडणूक केव्हाही लागू शकते. निवडणूक लागण्याच्या अनुषंगाने सातारा जिह्यात राजकीय मोट बांधणी पुर्ण झाली आहे.