प्रतिनिधी / सातारा :
सातारच्या जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांना शासनाकडून देण्यात आलेली चारचाकी त्यांच्या निवासस्थानच्या खाली असलेल्या पार्किंगमधून चोरीला गेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘वर्ग एक’च्या अधिकाऱ्याच्याच चारचाकीवर चोरट्यांनी डल्ला मारल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, सातारा-कोरेगाव रस्त्यावर शासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. एकाच परिसरात ‘तक्षशिला’ आणि ‘नालंदा’ ही दोन अपार्टमेंट असून येथे वर्ग एकच्या दर्जाचे अधिकारी राहतात. ‘नालंदा’मध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते राहतात. त्यांना जिल्हाभरात पुरवठा विभागाच्या अनुषंगाने दौरे करता यावेत म्हणून प्रशासनाने सुमो गाडी (एमएच 11 – एबी 166) दिली असून त्या गाडीवर पुढे ‘महाराष्ट्र शासन’ असे लिहले आहे. या गाडीवर चंद्रकांत हिंदूराव पवार (रा. पवाराची निगडी, ता. सातारा) हे चालक आहेत. सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी सुमो गाडी ‘नालंदा’ अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावली आणि ते घरी गेले. मंगळवारी सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास ते ‘नालंदा’मध्ये आले असता त्यांना पार्क केलेल्या ठिकाणी सुमो गाडी दिसून आली नाही. कोणीतरी आजूबाजूला सुमो पार्क केली असावे, असे वाटले म्हणून आजूबाजूला पाहिली, मात्र काहीच दिसले नाही. याची कल्पना त्यांनी तत्काळ स्नेहा किसवे – देवकाते यांना दिली. याबाबतची तक्रार चंद्रकांत पवार यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली असून अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.