प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ बेळगावात आले आहेत. विकासकामांची पाहणी करून महापालिका कार्यालयात बैठक घेण्यात येणार असल्याने स्वच्छता करून जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र पालकमंत्र्यांची मनपा कार्यालयातील बैठक ऐनवेळी रद्द झाली.
कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यापासून महापालिकेच्या कामांचा आढावा जिल्हा पालकमंत्र्यांनी घेतला नव्हता. त्यापूर्वी जिल्हा पालकमंत्री तसेच नगरविकासमंत्र्यांनी महापालिका कार्यालयात बैठक घेऊन विकासकामांचा आढावा घेतला होता. त्याचप्रमाणे नागरिकांच्या व कार्यालयीन कामकाजातील अडचणी जाणून घेतल्या होत्या. मात्र मागील दोन वर्षांपासून महापालिका कार्यालयाकडे कोणीच फिरकले नाही. सध्या जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ बेळगाव जिल्हय़ाच्या दौऱयावर आहेत. यावेळी बेळगाव शहरात स्मार्ट सिटी आणि महापालिकेने राबविलेल्या विकासकामांची पाहणी केली. तसेच या दौऱयादरम्यान महापालिका कार्यालयाला भेट देऊन विकासकामांची माहिती घेण्यासाठी महापालिका कार्यालयात बैठक घेणार होते.
कौन्सिल सभागृहाची स्वच्छता करून बैठकीसाठी सज्ज करण्यात आले होते. मात्र जिल्हा पालकमंत्र्यांच्या दौऱयात बदल झाल्याने महापालिका कार्यालयातील बैठक ऐनवेळी रद्द केली. महापालिका सभागृह अस्तित्वात नसल्याने नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराची माहिती घेणे आवश्यक होते. मात्र ऐनवेळी दौऱयात बदल करण्यात आल्याने बैठक झाली नाही.









