तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आज शनिवारी सात रस्ता येथील जिल्हा नियोजन भवनमध्ये डिपीडीसीची बैठक पार पडली. याबैठकीत जिल्हा परिषद, मनपा शाळेच्या हस्तांरणाप्रकरणामुळे उमेश पाटील, आनंद चंदनशिवे यांच्यात कलगीतुरा पहावयास मिळाला.
जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेच्या हद्दवाढ भागांमध्ये आल्या आहेत. त्या जागा आणि शाळा हा त्यांचा विषय नरगसेवक आनंद चंदनशिवे यांनी उपस्थित केला. मागील कित्येक वर्षापासून हा विषय सुरू आहे मात्र यावर ठोस निर्णय होत नाही. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला असल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांनी जागेचे पैसे महापालिकेने द्यावेत अशी मागणी केली. उमेश पाटील यांच्या प्राईम लोकेशन या शब्दावर चंदनशिवे चांगले भडकले. पालकमंत्र्याच्या आदेशानंतर हा वाद थांबला.
ग्रामपंचायत निवडणुकीमुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक लांबणीवर पडली होती. अखेर आज शनिवारी जिल्हा नियोजन बैठक पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पडली. दरम्यान, याबैठकीत अतिवृष्टी निधी वाटप, ग्रामीण रस्ते, वीज बील, राष्ट्रीयकृत बँक कर्जवाटप, शाळा पाडकाम यासह विविध विषयांवर बैठक चांगलीच गाजली.
जिल्हा परिषद शाळा, महापालिकेला हस्तांतरण प्रकरणात प्राईम लोकेशन शब्दावर नगरसेवक आनंद चंदनशिवे, जि. प. सदस्य उमेश पाटील यांच्यात चांगलीच जुंपली होती. गरिबांची मुले तिथे शिकतात त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. आमदार सुभाष देशमुख यांनी यामध्ये सामोपचाराने हा विषय असावा अशी अपेक्षा व्यक्त केली. या विषयात आमदार विजयकुमार देशमुख यांनी सुभाष देशमुख यांची बाजू लावून धरून कायमचा तोडगा काढण्याची मागणी केली. दरम्यान चंदशिवे यांनी उमेश पाटलांना टार्गेट करत प्राईम लोकेशन वरून माफी मागावी, अशी मागणी केली. आमदार संजयमामा शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, वसंत नाना देशमुख यांनी या विषयात आपले मत व्यक्त केले. यावर पालकमंत्री भरणे यांनी जिल्हा परिषद एनओसी देईल, शाळा खोल्या दुरूस्त करा अशा सूचना महापालिका आयुक्तांना केल्या तेव्हा महापालिका आयुक्तांनी मालकी नसेल तर दुरूस्ती करता येत नाही असे उत्तर दिले.
राष्ट्रीय बँकांच्या कर्ज प्रकरणाच्या धोरणावरून आमदारांचा संताप जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार राजेंद्र राऊत, आमदार संजय शिंदे, उमेश पाटील, खा. रणजीतसिंह निंबाळकर, आमदार राम सातपुते, यांनी जिह्यातील राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, मागासवर्गीय घटक, अपंग यांना कर्ज प्रकरणामध्ये वाईट वागणूक दिली जाते. झोपडपट्टीतील लोकांना जाणीवपूर्वक रेड झोनमध्ये टाकले जाते. विशेषकरून मागासवर्गीय बाबतीत असे घडते असा संताप आमदारांनी व्यक्त केला. यावर पालकमंत्री भरणे यांनी येत्या 15 दिवसात लीड बँक तसेच सर्व राष्ट्रीय बँकाच्या मॅनेजरची बैठक लावून हा विषय सोडण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. |
अतिवृष्टी, महापुरप्रकरणी आमदार आक्रमक अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिह्यातील अनेक नदीवरील बंधारे वाहून गेले आहेत. पंढरपूर, मोहोळ, अक्क्लकोट, माळशिरस, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा तालुक्यातील भीमा, मान, सीना नदीवरील बंधारे वाहून गेली आहे. बंधारे दुरूस्त करण्यासह अतिवृष्टी, पुराचे भरपाई मिळाली नाही. हा मुद्दा सर्व आमदार व सदस्यांनी उपस्थित केला असता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक लावण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी घेतला. |
ठळक बाबी….. मोहोळ तालुक्यातील रस्त्यांची वाई अवस्था आहे, रस्ते लवकर दुरूस्त करा अशी मागणी आमदार यशवंत माने यांनी केली. महापुरात मदत करणाऱ्या माळशिरसच्या व्यक्तीला शौर्य पदक देण्याची आमदार राम सातपुते यांनी केली मागणी अनधिकृतपणे शेतकऱ्यांच्या कनेक्शन कट केले आहे ते जोडून देण्याची मागणी सातपुते यांनी केली बार्शी तालुक्यात महापुरात वाहून गेलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना अद्याप मदत निधी दिली गेली नाही तातडीने मदत देण्याची मागणी आमदार राजेंद्र राऊत यांनी केली. |