प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी बुधवारी होत असलेल्या निवडीकडे साऱया जिल्हय़ाचे लक्ष लागले आहे. या पदाचा उमेदवार ठरवताना शिवसेनेकडून ज्येष्ठत्वाला की तरूणाईला संधी मिळणार, याची चर्चा जि. प. वर्तुळात रंगली आहे. या पदासाठी उमेदवाराची माळ आयत्या वेळी कोणाच्या गळय़ात पडणार, याचे उत्तर बुधवारी मिळणार आहे. याचवेळी महाआघाडीचा निर्णय झाल्यास काही अनपेक्षित नावेही पुढे येण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद गेल्या अनेक वर्षांनी सर्वसाधारण प्रवर्गासाठी मिळाले आहे. त्यामुळे या पदावर विराजमान होण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांनी प्रमुख पदाधिकाऱयांची जि. प. अध्यक्ष दालनाता याबाबत बैठकही घेतली होती. त्यावेळी 1 जानेवारी रोजी सर्व सदस्यांनी निवड प्रक्रियेला हजर राहण्याचे आदेशही काढले होते.
अध्यक्षपदाची निवड बुधवारी होत असल्याने या पदासाठी ज्येष्ठ सदस्य उदय बने, संगमेवरचे रोहन बने, रत्नागिरीतून महेश उर्फ बाबू म्हाप, चिपळूणमधून विक्रांत जाधव यांच्या नावांची जोरदार चर्चा समर्थकांकडून होत आहे. माजी सभापतींचीही नावे इच्छुकांमध्ये अग्रभागी मानली जात आहेत. जिल्हा नियोजन समिती सदस्यपद 3 वेळा मिळालेल्या सदस्यांना या निवडीत पुन्हा संधी दिली जाणार नसल्याचे शिवसेनेच्या गोटातून बोलले जात आहे. सभापतीपदांच्या शर्यतीत सुनील मोरे, महेश नाटेकर, लक्ष्मी शिवलकर, परशुराम कदम, चंद्रकांत मणचेकर, यांची नावे आघाडीवर आहेत. या निवडीमध्ये पाचही विधानसभा मतदारसंघांना न्याय देण्याचा प्रयत्नही संघटना स्तरावर सुरु असल्याचे समजते. याचवेळी महाविकास आघाडीच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून आल्या तर त्यामध्ये घटक पक्षातील सदस्यांचा विचार होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
बुधवारी 1 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. दुपारी 3 ते 3.10 अर्जांची छाननी व 3.10 ते 3.20 उमेदवारी अर्ज मागे घेणे, त्यानंतर आवश्यकता वाटल्यास मतदान घेतले जाणार आहे. या पद निवडीचा रिमोट शिवसेनेच्या वरिष्ठ स्तरावर असल्याने या निवडीत कोणाची वर्णी लागणार, याचा आज सोक्षमोक्ष लागणार आहे.









