आज ओरोस शाळेत शुभारंभ
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा दीड वर्षानंतर सुरू झाल्याने जिह्यातील सर्व शाळांमध्ये स्वछता मोहीम राबविण्याचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने घेतला आहे. 25 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत शाळा स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते 25 ऑक्टोबरला ओरोस शाळेतून स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ होणार आहे.
कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मार्च 2020 पासून राज्यातील शाळा बंद आहेत. सद्यस्थितीत कोरोना ओसरल्याने दीड वर्षानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आणि पाचवीपासून शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, कोरोनाची भीती अजूनही गेलेली नाही. त्यामुळे शाळेत अजूनही शंभर टक्के विद्यार्थी येत नाहीत. लवकरच पहिली ते चौथीच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या मनात भीती राहू नये, यासाठी कोविडचे नियम पाळून शाळा सुरू ठेवण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेमार्फत केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर गेले दीड वर्ष बंद असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा व शाळांचा परिसर स्वच्छ असणे आवश्यक असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. शिक्षक, ग्रामस्थ, पालक वर्ग यांच्या मदतीने सर्व शाळा व शाळा परिसर स्वच्छ करणे तसेच गरजेनुसार रंगरंगोटी करण्याचे काम केले जाणार आहे. जिल्हय़ातील प्रत्येक शाळेमध्ये 25 ते 30 ऑक्टोबर या सहा दिवसात ही मोहीम राबविली जाणार आहे. याचा शुभारंभ ओरोस प्राथमिक शाळेत अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते केला जाणार आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, जि. प. पदाधिकारी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.









