पदाधिकाऱ्यांची वाहने जमा, दालनेही केली ‘लॉक’
कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभागृहाची मुदत रविवारी संपुष्टात आल्यामुळे सोमवारपासून प्रशासकराज सुरु झाले. त्यामुळे आता निवडणूका होईपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण प्रशासक पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. चव्हाण यांनी सोमवारी सर्व विषय समित्या नव्याने गठीत करून प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात केली.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या वादात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबणीवर पडल्या असून त्या ठिकाणी प्रशासक नियुक्त करण्याचे शासनाने आदेश काढले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिह्यातील बारा पंचायत समितींमधील संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासक पदाचा कार्यभार स्विकारला आहे. निवडणुका होईपर्यंत त्यांना प्रशासकाची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व विषय समिती सभापती तसेच पंचायत समिती सभापतींकडे असणारी वाहने सोमवारी जि.प.प्रशासनाकडे जमा करण्यात आली. तसेच सभापतींची दालने बंद केली असून तेथे कार्यरत कर्मचाऱयांना त्यांच्या मूळ ठिकाणचा पदभार दिला जाणार आहे.