प्रतिनिधी / सांगली
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागांतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडील गट-क संवर्गातील माहे मार्च 2019 च्या जाहिरातीनुसार आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबतची परीक्षा शासन शुध्दीपत्रक 20 ऑगस्ट 2021 नुसार 16 व 17 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती. आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक शासनस्तरावरून लवकरच घोषित करण्यात येईल याची संबधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवड समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.
शासनाच्या 29 सप्टेंबर 2021 रोजीच्या परिपत्रकानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट-क व गट-ड संवर्गातील विविध पदांची परीक्षा 24 ऑक्टोबर रोजी आयोजित केली आहे. या परीक्षेसाठी वापरण्यात येणारी परीक्षा केंद्रे व जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडील परीक्षेसाठी वापरण्यात येणारी केंद्रे एकच आहेत तसेच साधनसामुग्रीपण एकच आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेकडील ग्राम विकास अंतर्गत आरोग्य विभागाच्या परीक्षा 16 व 17 ऑक्टोबर 2021 या तारखेस घेणे शक्य नसल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे कळविण्यात आले आहे.
Previous Articleदूरशिक्षणाच्या विद्यार्थ्यांची ‘क्यूआर कोड’वर प्रवेशपूर्व नोंदणी
Next Article माजी सैनिक वामन गोविंद देसाई यांचे निधन








