प्रतिनिधी/ मडगाव
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उद्या शनिवार दि. 12 रोजी होत असलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत पोलिसांना महत्वाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणाऱया अधिकाऱयांप्रमाणेच पोलीस देखील तेव्हढेच महत्वाचे असेल अशी स्पष्ट कल्पना काल गुरूवारी दक्षिण गोव्यातील पोलीस कर्मचाऱयांना देण्यात आली.
मडगाव रवींद्र भवनच्या मुख्य सभागृहात दक्षिण गोव्यातील पोलीस कर्मचाऱयांना दक्षिण गोव्याच्या पोलीस अधिक्षकांनी मार्गदर्शन केले. यावेळी दक्षिण गोव्यातील बहुतेह सर्व पोलीस स्थानकाचे निरीक्षक उपस्थितीत होते. उशिरा पर्यंत पोलीस कर्मचाऱयांना जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीसदंर्भात मार्गदर्शन केले जात होते.
जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी येणाऱया प्रत्येक मतदाराने मास्क वापरणे बंधन कारक आहे. जर कोणी मतदार मास्क विना आला तर त्याला मतदान करता येणार नाही. त्यासाठी पोलिसांना आपली जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. तसेच मतदान केंद्रावर येणाऱया मतदारांची थर्मल गनने तपासणी केली जाईल. त्यावेळी सुद्धा पोलिसांना कार्य तत्पर रहावे लागणार आहे. एखादा मतदार संशयास्पद असल्यास त्यावर त्वरित उपाय योजना आखावी लागणार आहे.
दक्षिण गोव्यातील काही मतदान केंद्र ही संवेदनशील असून त्यासाठी मतदारांची गर्दी होणार नाही याची काळजी देखील पोलिसांना घ्यावी लागेल असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. कुणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्ऩ निर्माण केल्यास पोलिसांनी विना विलंब कारवाई करावी असे स्पष्ट संकेतही यावेळी देण्यात आले.









