कार्यकाळ संपल्यानंतर जिल्हा प्रभारी सचिव कामकाज हाती घेणार
प्रतिनिधी / बेंगळूर
अलिकडेच मतदारसंघांची पुनर्रचना करून जिल्हा पंचायतींच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी चालविली होती. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे या निवडणुका घेणे शक्य नसल्याने राज्य सरकारने सर्व 30 जिल्हा पंचायतींवर जिल्हा प्रभारी सचिवांना प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमण्याबाबत अधिकृत आदेश दिला आहे. जिल्हा पंचायतींचा कार्यकाळ संपलेल्या दुसऱयाच दिवशी तेथे प्रशासकीय अधिकारी कामकाज हाती घेणार आहेत. राज्य सरकारचे सचिव नवीनकुमार यांनी सोमवारी हा आदेश दिला.
राज्यातील जिल्हा पंचायतींचा कार्यकाळ मे आणि जून महिन्यात संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास आणि पंचायतराज खात्याने अलिकडेच मतदारसंघ पुनर्रचना केली होती. आता कोरोना परिस्थितीमुळे निवडणुकांची प्रक्रिया हाती घेणे शक्य नसल्याने राज्य सरकारने कर्नाटक ग्रामस्वराज आणि पंचायतराज अधिनियम 1993 च्या परिच्छेद 321 मध्ये असणाऱया अधिकाराचा वापर करून जिल्हा पंचायतींवर प्रशासकीय अधिकारी नेमण्याचा आदेश दिला आहे. ज्या दिवशी जिल्हा पंचायतीचा कार्यकाळ संपेल त्याच्या दिसऱया दिवसापासून पुढील निवडणूक होऊन जिल्हा पंचायतीवर अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड होईपर्यंत प्रशासकीय अधिकारी कामकाज सांभाळणार आहेत.









