अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार, 25 जून 2021, सकाळी 11.30
● जिल्ह्यात 814 नवे रूग्ण● एकूण 9810 चाचण्या ● गर्दीत नियम पायदळी ● रूग्णवाढीत जिल्हा पहिल्या सातमध्ये ●आज जिल्हा प्रशासन घेणार आढावा
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील कोरोना रूग्णवाढीचा आकडा स्थिरावलेला असून, कराड तालुक्यातील रूग्णवाढीने पुन्हा 250 च्यावर उसळी घेतली आहे. त्यापाठोपाठ सातारा तालुक्यातील वाढ असून या दोन्ही तालुक्यात एकूण 28 रूग्णांचे मृत्यू झाले आहेत. दरम्यान यापार्श्वभुमीवर मुख्यमंंत्र्यांनी सात जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याशी गुरूवारी संवाद साधत घाईने निर्बंध शिथील न करण्याच्या सुचना दिल्या. त्यामुळे सातारा जिल्हा कोरोना रूग्णवाढीच्याबाबतीत अजुनही धोक्याच्या पातळीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. कालच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी आज काय निर्णय घेणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात शुुक्रवारी आलेल्या अहवालानुसार 814 रूग्णांची वाढ झाली आहेे. तर एकूण पॉझिटिव्हिटी रेट 8.26 झाला आहे..
पॉझिटिव्हीटी रेट वाढतोय
जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल झालेे असून रूग्णवाढीचा आकडा पंधरा दिवसांपासून जैसे थे आहे. गेल्या 24 तासात रॅपीड एण्टीजन टेस्ट 6149 झाल्या असून त्यापैकी 473 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आरटीपीसीआर टेस्ट 3661 झाल्या असून त्यामधे 337 पॉझिटिव्ह आले आहेत तर एकूण 9810 जणांच्या टेस्ट झाल्या असून 814 पॉझिटिव्ह आले आहेत.
बाजारपेेठांमधे तुफान गर्दी, नियमांकडे दुर्लक्ष
कोरोना रूग्णांची वाढ एका ठराविक आकड्याच्या भोवती स्थिरावली असताना बाजारपेठांमधे गर्दी वाढताना दिसत आहे. बरेच व्यापारी, व्यावसायिक, नागरिक हे नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करत आहेत तर अनेक नागरिक हे विनामास्क गर्दी करताना दिसत आहे. कोणाचा मास्क गळ्यात तर कोणाचा मास्क कानाला अडकवलेला अशी स्थिती बाजारपेठांमधे दिसत आहे. त्यामुळे कोरोना रूग्णवाढीचा आलेख कमी कसा करायचा हा प्रश्नच आहे.
कालच्या बैठकीनंतर आज काय निर्णय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी सात जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधत कोरोनाची जिल्ह्यातील स्थिती जाणून घेतली. सोमवारचा 433 चा अपवाद वगळता जिल्ह्याची रूग्णवाढ अजुनही 800 च्या आसपासच आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दर शुक्रवारी जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जातो. त्यामुळे कालची मुख्यमंत्र्यांशी झालेली संवादात्मक बैठक आणि आठवड्याची स्थिती पाहून निर्णय होईल असे दिसते.
जिल्हय़ात गुरूवारी एकूण बाधित – 814, एकूण मुक्त – 748, एकूण बळी- 23
जिल्ह्यात गुरूवारपर्यंत एकूण नमूने – 1010449, एकूण बाधित – 189609, घरी सोडलेले – 175865, मृत्यू -4255, उपचारार्थ रुग्ण- 9,472









