बालकाच्या अहवालाने दिलासा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार घेत असलेल्या साखरतर येथील सहा महिन्यांच्या बाळाचाही कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने शुक्रवारा जिल्हय़ाला मोठा दिलासा मिळाला आहे. गुरूवारी रात्री प्राप्त झालेले सर्व 16 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या अहवालामुळे प्रशासन व जिल्हय़ाला मोठा दिलासा मिळाला असून जिल्हा कोरोना मुक्तीच्या उंबरठय़ावर आहे, मात्र नागरिकांनी यापुढेही खबरदारी घेणे गरजेचे असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
रत्नागिरी जिह्यात कोरोनाचे सहा रुग्ण सापडले होते. यापैकी खेड येथील एकाचा उपचाराआधीच मृत्यू झाला तर गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील रूग्ण पुर्णपणे बरा होऊन घरी परतला आहे. राजीवडा येथील रुग्णाचे दोन्ही अहवाल निगेटीव्ह आले असून त्यांना आणखी 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आला आहे. साखरतर येथे सर्वाधिक 3 रूग्ण आढळले होते. यातील 2 महिलां रूग्णांचा अहवाल यापूर्वीच निगेटिव्ह आला होता. त्यामुळे कोरोना पॉझीटीव्ह म्हणून उपचार घेणाऱया 6 महिन्यांच्या बाळाच्या अहवालाकडे लक्ष लागले होते. या बालकाचा अहवालही निगेटिव्ह आल्याने जिह्यावरचे कोरोनाचे संकट कमी झाले आहे. या बाळाचा दुसरा स्वॅबही तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी घेतलेली खबरदारी आणि शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका यांची मेहनत यामुळे आज रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहे. जिल्हा रूग्णालयाचे कोरोना रूग्णालयात करण्यात आलेले रूपांतर, सर्व कोरोनाग्रस्तांच्या उपचारांबाबत घेतली जात असलेली काळजी, व डॉक्टर-परिचारिका व अन्य सहकाऱयांकडून दिवस-रात्र घेतल्या जाणाऱया मेहनतीचे हे मोठे यश आहे. त्यामुळेच सध्या तरी कोरोनाग्रस्तांची संख्या शुन्य करण्यात बऱयापैकी यश आल्याचे दिसून येत आहे. कोरानाग्रस्त बालकाचा अहवालही निगेटीव्ह आल्याने रत्नागिरीकरांकडून समाधान व्यक्त होत आहे. मात्र कोरोनाच्या संकटातून आता मुक्त झाल्याच समज करून कोणीही अति उत्साह दाखवू नये, असे आवाहन आता जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी अत्यावश्यक सेवेशिवाय बाहेर पडू नये म्हणून गेले महिनाभर पोलीस दलाकडून 24 तास डय़ुटी बजावली जात आहे. नियमभंग करणाऱयाविरोधात पोलीसांनी सुरू केलेल्या कारवाईच्या धास्तीने का होईना लोक बाहेर पडण्यावर मर्यादा आल्या व त्यामुळे कोरानाचा प्रसार रोखण्यात मोठी मदत झाली. पोलीस अधिकारी, आरोग्य यंत्रणा व सामाजिक संस्थांनी गावोगावी कोरोना विषयी जनजागृती केली, त्याचेही सकारात्मक परिणाम दिसत आहे.
प्रशासनासह सर्व सहकाऱयांचे यश
जिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचाऱयांनी अत्यंत संयम ठेवत, 24 तास अलर्ट राहून उत्तमपणे रूग्ण सेवा केली. जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी आवश्यक साधनसामग्री पुरवठा केल्याने खूप मदत झाली लोकप्रतिनिधींचेही खूप सहकार्य मिळाले. या टीमवर्कमुळे जिल्हयात सध्या तरी कोरोनाच्या एकही पॉझीटीव्ह रूग्ण नसल्याचे समाधान वाटते.
–डॉ. अशोक बोल्डे
जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी
दिलासादायक, पण संयम पाळा
वैद्यकीय टीमने घेतलेल्या प्रचंड मेहनतीमुळे जिल्हय़ातील पाचही कोरोनाग्रस्त रूग्ण आता पुर्णपणे बरे होण्याचा मार्गावर आहेत. ही बाब सर्वासाठीच दिलासादायक व आनंददायी असली तरी नागरिकांनी यापुढेही संयम बाळगणे गरजेचे आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करा. सोशल डिस्टन्सिंग ठेवत यापुढेही खबरदारी घ्या. तरच आपण खऱया अर्थाने कोरोनामुक्त होऊ.
लक्ष्मीनारायण मिश्रा
जिल्हाधिकारी, रत्नागिरी









