प्रतिनिधी/ सातारा
गेले 65 दिवस अत्यावश्यक सेवेत समावेश नसलेली दुकाने बंद होती. मात्र पॉझिटिव्हीटी कमी झाल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले. सोमवार 21 जून पासून शनिवार व रविवारी वीकेंड लॉकडाऊन सुरू राहणार असून यात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. तर सोमवार ते शुक्रवारी अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे 64 दिवसांनी बाजारपेठा खुल्या होणार असल्याने व्यापाऱयांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अद्यापही काळजी घेणे व नियम पाळणे सर्वांसाठी आवश्यकच असून त्यामुळेच तिसऱया लाटेचा धोकाही टळू शकतो.
कोविड रुग्णांचा पॉझिटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस् टक्केवारीच्या निकषानुसार जिल्हय़ाचा तिसऱया स्तरामध्ये समाविष्ट झाला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी निर्बंध शिथिल केले आहेत. शनिवारी व रविवारी वीकेंड लॉकडाऊन असल्याने बाजारपेठा सोमवारी 21 रोजी उघडणार आहेत. आठवडय़ात सर्व दिवशी सकाळी 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी 5 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचार बंदी लागू करण्यात येत आहे. त्यामुळे संचारबंदीच्या वेळेत वैध कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीस संचार करण्यास मनाई करण्यात येत आहे.
शाळा बंद पण दुकाने निर्धारित वेळेत सुरू
जिल्हय़ातील सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद राहतील. तथापि, ऑनलाईन शिक्षण सुरू असेल. वैद्यकीय महाविद्यालये, नर्सिंग कोर्सेस चालू असतील. अत्यावश्यक बाबीची दुकाने, आस्थापना आठवडय़ात सर्व दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मात्र मेडिकल, औषधांची दुकाने सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत चालू राहतील. हॉस्पीटलमधील मेडिकल, औषधांची दुकाने पुर्णवेळ चालू राहतील. मॉल, सिनेमागृहे, नाटय़गृहे पूर्णपणे बंद राहतील.
बार, दारु दुकाने हॉटेल 50 टक्के क्षमतेने सुरू
सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 4 या वेळेत हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी असेल. आठवडय़ाच्या सर्व दिवशी सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत घरपोच पार्सल सेवेस परवानगी असेल. लॉजिंग, बोर्डींगला परवानगी असेल. दारु दुकाने, बार यांनाही 50 टक्के क्षमतेने परवानगी देण्यात आली असून सकाळी 9 ते 4 या यावेळेत हे सुरु राहणार आहेत.
व्यायाम करा फक्त सकाळी तीन तास
सार्वजनिक जागा, खुली मैदाने, चालणे, सायकलसाठी आठवडय़ाचे सर्व दिवशी सकाळी 5 ते सकाळी 9 या वेळेत परवानगी असेल. सर्व खासगी कार्यालये सायंकाळी 4 पर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. शासकीय, निमशासकीय कार्यालये 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी आहे. कोणत्याही क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यास मनाई असेल. आयसोलेशन बबलमध्येच चित्रीकरण व वास्तव्य करणे बंधनकारक राहील. गर्दी होईल, असे चित्रीकरण करता येणार नाही.
धार्मिक स्थळे बंदच, मेळाव्यांना बंदी
सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक स्थळे, करमणूक कार्यक्रम, मेळावे बंद राहतील. तथापि सेवेकरी यांना त्यांच्या सेवा करता येतील. बाहेरील भक्तांस प्रवेश असणार नाही. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजीत करण्यास मनाई आहे. ते वगळून इतर क्षेत्रात लग्नग्न समारंभ दोन तासाच्या कालावधीत 25 लोकांच्या मर्यादे आयोजन करण्याकामी तहसिलदारांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.
अंत्यविधीसाठी फक्त 20 लोकांना परवानगी
अंत्यविधी व दशक्रिया विधी जास्तीत जास्त 20 जणांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी असेल. स्थानिक संस्था, सहकारी संस्थाच्या सर्वसाधारण सभा ठिकाणाच्या 50 टक्के क्षमतेने घेण्यास परवानगी असेल. सर्व बांधकामांना परवानगी असेल. शेतीविषयक दुकाने सर्व दिवस सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. ई-कॉमर्सच्या वस्तू तसेच सेवा नियमितपणे सुरू राहतील.








