कोरोना बैठकीत पंतप्रधान मोदी यांची सूचना, कोरोना परिस्थितीची केली सविस्तर समीक्षा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या ज्येष्ठ अधिकाऱयांची बैठक घेतली आहे. रविवारी संध्याकाळी झालेल्या या बैठकीत देशभरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. पुरेशा प्रमाणात औषधे, ऑक्सिजन, रुग्णालयांमधील बेडस् उपलब्ध आहेत की नाहीत, यासंबंधी या बैठकीत आढावा घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या उद्रेकाला, तसेच ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रसाराला यशस्वीरित्या परतविण्यासाठी जिल्हा पातळीवर आरोग्य सेवा आणि सुविधा बळकट कराव्यात आणि सर्व दक्षता आधीपासूनच घेतली जावी, अशी महत्वाची सूचना त्यांनी केली, असे वृत्त आहे.
कोरोना तसेच त्याचे ओमिक्रॉन हे नवे रुप यांना तोंड देण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पायाभूत आरोग्य सुविधांची सज्जता ठेवण्यात यावी. प्रत्येक राज्याने यासाठी विशेष योजना तयार करुन अगोदरपासूनच दक्षता घ्यावी. स्थानिक पातळीवर अधिकऱयांनी सज्ज रहावे, आदी सूचना त्यांनी केल्या.
संख्येचाही आढावा
कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ, वाढीचा वेग, ओमिक्रॉनची वाढ, प्रौढांचे लसीकरण, 15 ते 18 वयोगटातील युवकांचे लसीकरण, लसीकरणाचा परिणाम, नवी आव्हाने आणि त्यांसंबंधीची तयारी या सर्व मुद्दय़ांवर बैठकीत सांगोपांग चर्चा झाल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान मोदींना या सर्व मुद्दय़ांवर माहिती देण्यात आली. रुग्णसंख्या वाढत असली तरी घाबरुन जाण्याचे कारण नाही. लोकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. मास्क आणि सॅनिटायझर यांचा उपयोग सातत्याने करावा, अशाही सूचना अधिकाऱयांनी यापूर्वीच दिल्या आहेत.
राज्यस्तरावर असणाऱया सज्जतेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांचीही बैठक घेणार आहेत. प्रत्येक राज्याने कोरोना नियमांचे पालन आणि लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी पूर्ण सज्जता ठेवावी. लसीकरण अभियानाला अग्रक्रम द्यावा, असेही प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीत केल्याचे नंतर स्पष्ट करण्यात आले.
निवडणुकांचीही पार्श्वभूमी
पंतप्रधान मोदींच्या या बैठकीचे एक कारण पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा हे देखील आहे. या निवडणुकांचे मतदान 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत होणार आहे. उत्तर प्रदेशात 7 टप्प्यांमध्ये, मणिपूरमध्ये 2 टप्प्यांमध्ये, तर पंजाब, गोवा आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. ऐन कोरोना उद्रेकाच्या काळात या निवडणुका होणार असल्याने त्यांच्यावरही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
संसदेचे अधिकारीच कोरोनाग्रस्त
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला जानेवारीच्या अखेरीपासून प्रारंभ होत आहे. तथापि, त्याआधीच संसदेचे 400 हून अधिक कर्मचारी कोरोनाने ग्रस्त झाले आहेत. हा चिंतेचा विषय असून त्यावर बैठकीत उहापोह झाल्याचे वृत्त आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक ती सज्जता ठेवण्यात येत असून अधिवेशनाच्या वेळेपर्यंत बहुतेक सर्व कर्मचारी बरे होतील, असे अनुमान आहे. नेहमीप्रमाणे अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होऊ शकतो.









