प्रतिनिधी/ खेड
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पटटय़ामुळे सोमवारी जिह्यात सर्वत्र पावसाच्या हलक्या सरी पडल्या. रविवारी काही भागात पावसाने हजेरी लावली होती. मात्र सोमवारी सकाळपासून दुपारपर्यंत जिल्हाभर झालेल्या पावसाने बळीराजासमोर पुन्हा संकट उभे राहिले आहे. लांजा, राजापूर परिसरात पावसाचा जोर थोडा अधिक होता. या पावसात निसरडय़ा रस्तयांबुळे झालेल्या किरकोळ अपघातांव्यतिरिक्त मोठय़ा नुकसानाची नोंद झालेली नाही.
ऐन थंडीत पडलेल्या या पावसाने आंबा, काजूच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची व उन्हाळी शेतीचे गणित पुरते कोलमडण्याची भिती व्यक्त होत आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणखी एक-दोन दिवस कायम राहण्याच्या अंदाजाने बळीराजाची चिंता वाढली आहे. जिह्यात दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली असली तरी काही भागात ढगाळ वातावरण कायम होते.
पावस बाजारपेठेत सहा अपघात
रत्नागिरी तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. शहरात उखडून ठेवलेल्या रस्त्यांमुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पावस बाजारपेठेमधील दुसऱया मशिदीसमोर रस्ता निसरडा झाल्यामुळे मोटारसायकलस्वारांचे सहा अपघात घडले. यात काही किरकोळ जखमी झाले आहेत. नागरिकांनी निसरडय़ा रस्त्यावर दगड ठेवून सावधनतेचा इशारा दिल्यामुळे अधिक अपघात झाले नाहीत.
लांजा, राजापुरात जोरदार
राजापूर तालुक्यात गेले काही दिवस ढगाळ वातावरणासह हलक्या सरींनंतर सोमवारी जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. सकाळी 11 पासून जवळपास अर्धा तास पाऊस कोसळत होता. त्यानंतर प्रमाण कमी होत गेले. लांजा तालुक्यातही काही भागात जोरदार तर बहुतांश ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यामुळे शेतीच्या कामांचा खोळंबा झाला आहे.
संगमेश्वरात वायंगणी शेतीला फटका
संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी सोमवारी दुपारपर्यंत तुरळक पाऊस पडला. मात्र संध्याकाळी आकाश निरभ्र होते. तुरळक पावसामुळे तालुक्याचे वैशिष्टय़ असलेल्या वायंगणी शेतीला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चिपळुणात तुरळक
चिपळुणरात सोमवारी पहाटेपासून सकाळी 11.30 वाजेपर्यंत तुरळक पाऊस पडला. या पावसामुळे शहरासह परिसरातील रस्ते चिखलमय बनले होते. या पावसामुळे सकाळच्या वेळी घराबाहेर पडणारे कर्मचारी व विक्रेत्यांची धावापळ उडाली.
खेडमध्ये बागायतदार चिंतेत
खेडमध्ये सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. दुपारनंतर ही रिपरिप थांबल्याने साऱयांनीच सुटकेचा निःश्वास टाकला.
दापोलीत नागरिकांची तारांबळ
दापोलीत सोमवारी मात्र सकाळपासून पावसाने बरसण्यास सुरूवात केल्याने अनेकांची तारांबळ उडाली. ग्रामीण भागात गुरांचे वैरण भिजून मोठे नुकसान झाले आहे. अचानकपणे आलेल्या पावसाने शेतकऱयामध्ये काळजी निर्माण झाली आहे. या पावसाने अनेक पर्यटकही माघारी परतल्याचे दिसून आले.
शेतकऱयांना बागायतींची काळजी घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन
गेले काही दिवस ढगाळ वातावरण व रिमझिम पावसामुळे आंबा, काजू बागायतींची काळजी घेण्याचे आवाहन दापोली विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. यावर्षी आंबा उशिरा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंगळवारपर्यंत ही परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.









