शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल : दोन दुकानदारांवर केली कारवाई
प्रतिनिधी/ सातारा
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्हाबंदी आदेश लागू असताना मुंबईहून तसेच वहागाव (ता. कराड) येथून आलेल्या दांपत्यास महाडवरुन आलेल्या दोन भाजी विक्रेत्यांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर शहरातील एका साडी सेंटर व देवपुजा साहित्य विक्री करणाऱया अशा दोन दुकानदारांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यामध्ये जिल्हाबंदीचा आदेश तोडणाऱया विक्रांत बबन सावंत व प्रशांत बबन सावंत (रा. म्हाडा कॉलनी, चुनाभट्टी, मुंबई सध्या रा. मनिषा कॉलनी, तामजाईनगर सातारा) हे दोघेही दि. 21 एप्रिल रोजी मुंबईहून कारने आले होते. तर शनिवार पेठेतील एका घरात सूरज विठ्ठल पवार व त्याची पत्नी प्रणाली सूरज पवार (रा. वहागाव, ता. कराड) हे वास्तव्यास आले होते. प्रसन्न विजय देशमाने व अश्विनी विजय देशमाने (रा. बुधवार पेठ) हे विद्याविहार मुंबई येथून दि. 20 रोजी आले होते. त्यांच्यावर होम क्वारंटाईनचा शिक्का असला तरी विनापरवाना प्रवास केला होता. तर बुधवार पेठेत वास्तव्यास आलेल्या मोहम्मद हुसेन बशीर पालकर व शकिला मोहम्मद बशीर पालकर हे भाजी विक्रीसाठी गोरेगाव, महाड, रायगड येथे गेले होते. महाडमध्ये राहून ते साताऱयात आले होते त्यांच्याकडे प्रवास परवाना नव्हता. त्यांची माहिती तालुका आरोग्य अधिकाऱयांना कळवण्यात आली असून या सर्वांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक धनंजय कुंभार यांनी दिली आहे.
शासकीय आदेशाचा भंग करत मंगळवार पेठेतील दुर्गा साडी सेंटर सुरु ठेवल्याप्रकरणी अलोक हिरालाल डे व गोकूळ अलोक डे दोघे (रा. मंगळवार पेठ, सातारा) यांच्यावर कारवाई करण्यात आली. तर मोती चौकात उदबत्ती विक्रीचे दुकान उघडे ठेवल्याप्रकरणी श्रीराम नामदेवराव कोटगिरे (रा. भवानी पेठ, सातारा) यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार हसन तडवी यांनी दिली असून नागरिकांनी शासकीय आदेशाचा भंग न करता लॉकडाऊन कडकपणे पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी केले आहे.








