जानेवारी अखेरपर्यंत मिटींग घेऊन निर्णय द्या : म.ए.समितीच्या शिष्टमंडळाची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
महानगरपालिकेसमोर अनधिकृतरीत्या उभारलेला लाल-पिवळा ध्वज हटवावा या मागणीसाठी म. ए. समितीच्यावतीने गुरूवार 21 जानेवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र पोलिस प्रशासनाने मोर्चा काढू नका अशी विनंती केली. त्याला म. ए. समितीने सहमती दर्शविली. त्यानंतर गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांची म. ए. समितीच्या नेत्यांनी भेट घेतली. त्यावेळी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात बैठक घेऊ असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मात्र म. ए. समितीच्या नेत्यांनी फार उशीर होणार असल्याने जानेवारी 28 किंवा 29 तारखेला मिटींग घ्यावी असे सांगितले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी होकार दिला आहे.
यावेळी लाल-पिवळय़ा ध्वजाजवळ आम्ही भगवा उभा करतो त्यानंतर निर्णय घेऊन दोन्हीही ध्वज हटवायचे असतील तर हटवा असा अट्टाहास समितीच्या नेत्यांनी धरला. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी असे काही करू नका अशी विनंती केली.
यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, राजाभाऊ पाटील, नेताजी जाधव, मदन बामणे, दत्ता उगाडे, संजय मंडलिक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, दत्ता जाधव, अरविंद नागनुरी, प्रवीण तेजम, युवा म. ए. समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.