प्रतिनिधी/ नवारस्ता
सातारा जिह्यातील कोयना पर्यटन स्थळाचा मोह दस्तुरखुद्द जिल्हाधिकाऱयांनाही आवरता आला नाही. रविवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीही सहकुटुंब कोयनेत येऊन निसर्गसंपन्न कोयना पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला.
गतवर्षापासून कोरोनामुळे पर्यटनक्षेत्र लॉक आहे. याचा फटका कोयना येथील पर्यटन क्षेत्रालाही बसला आहे. पावसाळा आला की निसर्गसंपन्न कोयना पर्यटनाला बहर येतो. येथे सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे येथील धबधबे पर्यटकांना खुणावत आहेत. पर्यटकांचे आकर्षण असलेला ओझर्डे धबधबाही कोसळत असल्याने नेहमीच पर्यटकांनी हाऊसफुल असतो. कोयना पर्यटन आजपासून खुले झाल्याने पावसात चिंब होण्यासाठी पर्यटकांची पावले कोयनेत आजपासूनच वळली आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीही रविवारी सहकुटुंब निसर्गाचा आनंद लुटला. ओझर्डे धबधबा परिसरात पावसात ओले चिंब भिजण्याची इच्छा त्यांनी पूर्ण केली. मी आज जिल्हाधिकारी म्हणून नाही, तर पर्यटक म्हणून आलो आहे. अतिशय मनमोहक व सुंदर असणारे कोयनानगर युनोस्कोच्या जागतिक नेटवर्क ऑफ बायो स्फीअर रिझर्व्हचा भाग असून वन्यजीव विभागाने सुंदररित्या विकसित केलेला हा परिसर आहे. या ठिकाणी ब्रेड अँड ब्रेडफास्ट योजना चालू करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.








