प्रतिनिधी / कराड :
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पावसाळय़ातील संभाव्य महापुराच्या संकटाबाबत कराड नगरपालिकेकडून गतवर्षी केलेल्या व यावर्षीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. पाटण कॉलनीत कोयना नदीची पाहणीही केली. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी त्यांना माहिती दिली.
मागील वर्षी कोयना व कृष्णा नदीस महापूर आला होता. त्यात शेती आणि मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने यावर्षी करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी पाटण कॉलनी येथील अपार्टमेंटवरून कोयना नदी, कोयनेश्वर मंदिर परिसराची पाहणी केली. महापूर आल्यानंतर किती कुटुंबे बाधित होतात, त्यांचे पुनर्वसन कोठे होते, त्यांच्यासाठी किती शाळा ताब्यात घेतल्या आहेत, तेथील जेवण व निवासाची व्यवस्था याची माहिती त्यांनी घेतली. आवश्यक त्या सूचना केल्या.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांत उत्तम दिघे, पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, अभियंता अशोक पवार उपस्थित होते.








