जिल्हाधिकाऱयांच्या कक्षाचे सॅनिटायझेशन
बेळगाव : जिल्हय़ामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली असून हा आकडा आता जवळपास 3 हजारांहून अधिक झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना आता कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे सकाळीच जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या कक्षाचे सॅनिटायझेशन करण्यात आले. याचबरोबर परिसरातही फवारणीही करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये पोलीस तसेच सरकारी कर्मचाऱयांना कोरोनाची लागण होत आहे. हा आकडा देखील मोठा आहे.
आता खुद्द जिल्हाधिकाऱयांनाच कोरोनाची लागण झाल्यामुळे अधिकाऱयांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. कारण जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांबरोबर बैठका घेतल्या आहेत. अनेक संघटनांनी त्यांना निवेदनेही दिली आहेत. त्यामुळे इतरांनाही लागण झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशावर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत. कामानिमित्त आलेल्या व्यक्तींची विचारपूस करुनच त्यांना आत प्रवेश दिला गेला आहे. दोन व्यक्तींनाच प्रवेश देण्यात आला होता. तरी देखील जिल्हाधिकाऱयांना आता कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही कोरोनाची लागण झाल्याची भीती व्यक्त होत आहे.









