प्रतिनिधी/ महाबळेश्वर
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या स्वप्नातील महाबळेश्वर साकारण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सुशोभिकरणाच्या आराखडय़ाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून मंगळवारी जिल्हाधिकारी शेखर सिह यांनी महाबळेश्वरला भेट देऊन विविध ठिकाणांची पाहणी केली. यावेळी तहसिलदार सुषमा चौधरी-पाटील, मुख्याधिकारी पल्लवी पाटील उपस्थित होत्या.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासह सर्वच ठाकरे कुटूंबाचे महाबळेश्वरवर नितांत प्रेम आहे. याच शहरात स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसदार कोण याचा निर्णय झाला होता आणि याच शहरात उध्दव ठाकरे यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली होती म्हणून महाबळेश्वर हे शहर ठाकरे यांच्या जिव्हाळयाचे शहर आहे. शहराला सुशोभित करण्यासाठी त्यांनी तज्ञांच्या मार्फत एक आराखडा तयार करून घेतला आहे. या आराखडय़ाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शंभर कोटी रूपयांचा निधी मंजूर करून त्यापैकी पन्नास टक्के निधी वर्ग करण्यात आला आहे. आता लवकरच या आराखडय़ानुसार कामाचे भुमिपूजन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकाऱयांनी अधिकारी यांच्या समवेत बाजारपेठेसह विविध ठिकाणी भेट देऊन याची पाहणी केली.
पाहणी दौऱयात तहसिलदार सुषमा चौधरी-पाटील मुख्याधिकारी पल्लवी पाटील, प्रभारी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, पालिकेचे मुख्य लिपीक आबाजी ढोबळे, प्रणव सस्ते, हौशेट्टी अरूण वायदंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
आराखडय़ाची अंमलबाजवणीची सूचना
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी येथील पेटीट ग्रंथालयाच्या इमारत, सुशोभिकरणाच्या कामात वापरणाऱया येणाऱया साहित्यांची पाहणी केली. सुशोभिकरणाच्या आराखडय़ात अनेक कामांचा समावेश असला तरी कोणत्या कामला प्राधान्य द्यायचे याचा क्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसारच आराखडय़ाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱयांनी सोबतच्या अधिकाऱयांना केल्या.









