वेळीच पोलिसांनी धाव घेवून शिताफीने घेतले ताब्यात, घटनेने खळबळ
प्रतिनिधी/बेळगाव
अचानक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तिसऱया मजल्यावर चढून एकाने आत्महत्येची धमकी दिली. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच गोंधळ उडाला. तेथील कर्मचाऱयांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस आणि पत्रकार धावतच जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यांनी तातडीने त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. मात्र मला आत्महत्या करायची आहे, असे म्हणून तो जोरजोराने ओरडू लागला. या देशात न्याय मिळत नाही. त्यामुळे आत्महत्या हाच पर्याय आहे असे म्हणत असतानाच पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
मी रायबाग साखर कारखान्यामध्ये कामाला होतो. तेथून मला कमी करण्यात आले आहे. माझे नाव वामदेवन (रा. हरीपाडा-केरळ) असे तो सांगत होता. माजी बदली देखील करण्यात आली. याबाबत मी अनेकवेळा अधिकाऱयांशी संपर्क साधला. मात्र माझ्यावर झालेला अन्याय दूर करण्यास कोणीच पुढे आले नाहीत. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे, असे सांगून तो या देशात न्याय मिळणे कठीण आहे, असे जोराने ओरडत होता.
शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात येवून मला जिल्हाधिकाऱयांची भेट घ्यायची आहे, असे त्याने सांगितले. मात्र त्याला बराच उशीर बसविण्यात आले. त्यामुळे आता मी आत्महत्या करतो म्हणून तो धावतच तिसऱया मजल्यावर चढला. या प्रकारामुळे कर्मचाऱयांमध्ये एकच खळबळ उडाली. काय करावे हेच सुचेना. शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना याची माहिती देण्यात आली. ते पोलीस तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तिसऱया मजल्यावर धावतच गेले. वामदेवन याला शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर तो पत्रकारांसमोर आपली बाजू मांडत होता. मला नोकरीवरुन काढून टाकले आहे. मी घरासाठी मागणी केली. मात्र मला कोणच घर देण्यास तयार नाहीत. मी गेली 10 वर्षे या ठिकाणी काम करतो, असे सांगत होता. त्याच्या वागण्याबोलण्यावरुन त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र या घटनेमुळे काही वेळ मोठा गोंधळ उडाला.