वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची जिम्नॅस्ट प्रणती नायकचे येत्या ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित झाले आहे. खंडीय कोटय़ातून तिला पात्रता मिळाली आहे. 2019 मध्ये तिने आशियाई आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये व्हॉल्ट प्रकारात कांस्यपदक पटकावले होते.
आशियाई कोटय़ासाठी लंकेच्या एल्पितिया बडलगे डोना मिका गेह हिच्यानंतर प्रणती दुसरी राखीव खेळाडू होती. चीनमध्ये 29 मे ते 1 जून या कालावधीत होणारी नववी वरिष्ठांची आशियाई चॅम्पियनशिप होणार होती. पण कोरोना महामारीच्या कारणास्तव ती रद्द करण्यात आल्याने प्रणतीला ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळाली. ‘2019 मधील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मला पात्रता मिळविता आली नाही आणि नंतर कोरोना महामारीमुळे सर्वच स्पर्धा रद्द करण्यात आल्याने मी खूपच निराश झाले होते. मी ऑलिम्पिकमध्ये खेळू शकेन, ही आशाही सोडून दिली होती. पण आता या निर्णयामुळे ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न साकार होणार आहे,’ असे प्रणती म्हणाली. आशिया किंवा विश्व संघटनेकडून या संदर्भात अधिकृत घोषणा केली जाण्याची मी प्रतीक्षा करीत आहे, असेही ती म्हणाली.
दीर्घ काळापासून प्रणतीच्या प्रशिक्षक असलेल्या मिनारा बेगम यादेखील, प्रणतीला ऑलिम्पिक पात्रता मिळाल्याने आनंदित झाल्या आहेत. बेगम साई केंद्रात कार्यरत होत्या आणि 2019 मध्ये त्या तेथून निवृत्त झाल्या होत्या. ‘मंगोलियात झालेल्या आशियाई व जर्मनीतील वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेनंतर तिने मानांकन गुण कायम राखले होते आणि चीनमधील स्पर्धा रद्द झाल्यानंतर तिला आशियाई कोटा मिळाला. ती ऑलिम्पिकमध्ये खेळणार याचा मला खूप आनंद झाला आहे,’ असेही त्या म्हणाल्या.
उलानबातार येथील स्पर्धेत कांस्य मिळविल्यानंतर 2019 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चांगले प्रदर्शन करून ऑलिम्पिक पात्रता मिळविण्याची मी आशा केली होती. पण त्या स्पर्धेत बीम प्रकारात माझे चांगले प्रदर्शन झाले नाही. त्यामुळे वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील स्कोअरवर त्याचा परिणाम झाला. तेव्हा मी खूप निराश झाले होते, असे प्रणतीने सांगितले. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने एकूण 45.832 गुण मिळविताना व्हॉल्टमध्ये 14.200, फ्लोअर एक्सरसाईजमध्ये 11.133, बारमध्ये 10.566, बीममध्ये 9.933 गुण मिळविले. महामारीमुळे कोणतीही स्पर्धा होत नसली तरी ट्रेनिंग कायम ठेवत स्वतःला फिट ठेवले आहे, असेही तिने सांगितले.









