मराठा बँकेच्या सभासदांच्या गुणी मुलांचा गौरव
बेळगाव / प्रतिनिधी
लहानपणी विद्यार्थ्यांच्या पाठीवर पडलेली शाब्बासकीची थाप त्यांना भावी आयुष्यात प्रेरणादायी ठरते. यासाठी विद्यार्थ्यांनी लहानपणीच जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावे, विद्यार्थ्यांनी समाजात वावरताना आदराची भावना ठेवली पाहिजे. समाज हा मोठा असतो. या समाजातूनच संस्कृती निर्माण होते. अशा संस्कृतीचे संवर्धन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आजच्या युगात विद्यार्थ्यांना अनेक द्वारे खुली असून त्या दिशेने मनापासून प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते, असे प्रतिपादन माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी केले.
बसवाण गल्ली येथील मराठा को-ऑप. बँकेतर्फे सभासदांच्या गुणी मुलांचा गौरव सोमवारी बँकेच्या सभागृहात पार पडला. यावेळी मालोजी अष्टेकर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन दिगंबर पवार होते. व्यासपीठावर व्हा. चेअरमन नीना काकतकर, संचालक बाळासाहेब काकतकर, एल. एस. होनगेकर, बी. एस. पाटील, सुनील अष्टेकर, रेणू किल्लेकर, शेखर हंडे, एस. एस. खोकाटे, लक्ष्मण नाईक, विनोद हंगिरकर आदी उपस्थित होते.
अष्टेकर पुढे म्हणाले, कष्टातून घेतलेल्या शिक्षणाची पाळेमुळे खोलवर जातात. कष्ट करून ज्यांनी शिक्षण घेतले ती मुले शिक्षण क्षेत्रात पुढे गेलेली आहेत. कष्ट करायची सवय ठेवा. आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाचे बळ द्या आणि आपले पुढील आयुष्य उज्ज्वल बनवा. जीवनात आलेले अपयश पचवून पुढे जाण्याची ताकद आपल्यात निर्माण करा, असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
भावी आयुष्यात या सत्काराची प्रेरणा घ्या
यावेळी बोलताना बँकेचे संचालक बाळासाहेब काकतकर म्हणाले, ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना वेळोवेळी शैक्षणिक साहित्य देऊन मदत करण्यात येत आहे. मराठा बँक ही मराठी माणसाची मानबिंदू असून बँकेने आज सर्व सभासदांपर्यंत विविध सुविधा पुरविल्या आहेत. आजच्या स्पर्धेच्या युगात राष्ट्रीय बँकेच्या तोडीस तोड देऊन आणि आपली घोडदौड कायम ठेऊन विविध सुविधा पुरवत आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या भावी आयुष्यात या सत्काराची प्रेरणा घेऊन शिक्षण क्षेत्रात घवघवीत यश संपादन करावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत 70 टक्क्मयांहून अधिक गुण घेतलेल्या सभासदांच्या मुलांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्प देऊन गौरव करण्यात आला. प्रारंभी माजी आमदार कै. बी. आय. पाटील व केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी बँकेचे सभासद, पालक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.