क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
जितो विंग बेळगाव आयोजित जितो फुटबॉल लीग, दुसऱया पर्वात डी. डी. चौगुले संघाने विजेतेपद तर रोटरॅक्ट क्लब ऑफ बेळगाव संघाने उपविजेतेपद पटकाविले. आदर्श कामगौडा याला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
सदर स्पर्धा जितो युथ विंग्स या संघटनेतर्फे दुसऱया वषी बालिका आदर्श येथील केए 22 टर्फ फुटबॉल मैदानावर जितो विंगचे चेअरमन अक्षय जक्कण्णावर, सचिव एस. साकारिया, समन्वयक मोहित पोरवाल व दिपक पोरवाल यांच्या प्रयत्नाने ही स्पर्धा साखळी पद्धतीने सहा संघात खेळविण्यात आली.
या स्पर्धेचा अंतिम सामना डी. डी. चौगुले क्लब व रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ यांच्यात झाला. त्यामध्ये डी. डी. चौगुले क्लब संघाने विजय संपादन केला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या डी. डी. चौगुले क्लब संघाला 15 हजार रूपये व आकर्षक चषक तर उपविजेत्या रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ संघाला 8 हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून अनुज शहा, तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून आदर्श कामगौडा यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जितो विंग संघटनेच्या पदाधिकाऱयांनी विशेष परिश्रम घेतले.









