सुशील कुमारच्या ऑलिम्पिक शक्यतेला आणखी एक धक्का
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अलीकडील कालावधीत बरीच प्रगती करणाऱया जितेंदर कुमारने शुक्रवारी 74 किलोग्रॅम चाचणी जिंकत इटलीतील मानांकन मालिकेतील स्पर्धा आणि भारतातील आशियाई चॅम्पियनशिपसाठी आपली पात्रता निश्चित केली. पण, सुशील कुमारचे ऑलिम्पिक सहभागाचे स्वप्न संपुष्टात आणण्यासाठी त्याला पदक जिंकणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील स्टार मल्ल दीपक पुनिया (86 किलोग्रॅम) व रवी दहिया (57 किलोग्रॅम) यांना सहज विजय संपादन करता आल्याने त्यांची फारशी कसोटी लागली नाही. या उभयतांना फायनलमध्ये थेट प्रवेश मिळाला होता. सुमीत मलिक (125 किलोग्रॅम) व सत्यव्रत कडियन (97 किलो) यांनीही शानदार विजय मिळवत आपला सहभाग निश्चित केला.
सर्वाधिक चुरस असलेल्या 74 किलोग्रॅम वजनगटात जितेंदरने अमित धनकरविरुद्ध 5-2 असा विजय संपादन केला. शुक्रवारी होणाऱया चाचणीतील विजेते इटली (15 ते 18 जानेवारी), नवी दिल्लीतील आशियाई चॅम्पियनशिप (18 ते 23 फेब्रुवारी), क्झियान आशियाई ऑलिम्पिक पात्रता (27 ते 29 मार्च) या मानांकन स्पर्धांमध्ये खेळतील, असे भारतीय कुस्ती संघटनेने यापूर्वीच जाहीर केले होते. पण, याच संघटनेचे अध्यक्ष ब्रिज भूषण शरण सिंग यांनी क्झियान स्पर्धेपूर्वी नव्याने चाचणी घेतली जाईल, असे नमूद केले. याचाच अर्थ असा होतो की, जितेंदरला जर टोकियो ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित करायचे असेल तर त्याने रोम व नवी दिल्लीतील स्पर्धेत पदके जिंकत भारतीय कुस्ती संघटनेला आपला फॉर्म दाखवून द्यावा लागेल.
पहिल्या दोन पात्रता स्पर्धांमध्ये जर आमच्या मल्लांची कामगिरी समाधानकारक नसेल तर आम्ही आशियाई ऑलिम्पिक क्वॉलिफायरसाठी नव्याने चाचणी घेऊ. ऑलिम्पिकमध्ये आम्हाला आमचे सर्वोत्तम मल्ल पाठवायचे आहेत, असे शरण वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. भारताचा दोनवेळचा ऑलिम्पिक जेता सुशील कुमारने दुखापतीचे कारण देत शुक्रवारच्या चाचणीत भाग घेतलेला नाही. यापूर्वी वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सप्टेंबर 2019 मध्ये चाचणी झाली, त्यावेळी सुशीलने जितेंदरला अस्मान दाखवले होते.









