ऍमेझॉन, फ्लिपकार्टचा लवकरच बिग सेलच्या प्रारंभाचे संकेत : दिवाळीत स्पेशल सेल होणार सुरु
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या देशात रिलायन्सच्या विविध प्लॅटफार्मची जोरदार चर्चा सुरु असल्याचे मागील काही दिवसांपासून पहावयास मिळत आहे. यामध्ये प्रथम जिओ डिजिटल प्लॅटफार्ममधील झालेली विदेशी कंपन्यांची गुंतवणूक आणि त्या पाठोपाठ नव्याने जिओ मार्टची सुरुवात करण्यासाठीही गुंतवणुकीचा पर्याय वापरण्यावर भर दिला जात आहे. यामुळे आगामी काळात उद्योग क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करण्याची पायाभरणी करणाऱया जिओमार्टला टक्कर देण्यासाठी आता लवकरच ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट बिग सेलचा प्रारंभ करणार असल्याची माहिती आहे.
येत्या दिवाळीपर्यंत भारताच्या सर्वोच्च ई कॉमर्स कंपन्यांमध्ये डाळ तांदूळासह बाजारामध्ये स्पर्धेचं वातावरण निर्माण होण्याचे संकेत आहेत. ग्रॉसरीसाठी लोकप्रिय असणाऱया बिगबास्केट किंवा ग्रॉफर्सची ही चर्चा नाही तर ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टकडून ग्रॉसरीच्या मदतीने सेल्समध्ये आपला महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत हे सर्व प्लॅटफार्म स्पेशल फेस्टिव्हल सेल सुरु करण्याचे संकेत आहेत. जे नोव्हेंबरच्या दुसऱया आठवडय़ातील सादर करण्यात येणार आहेत. म्हणजे दिवाळीच्या सणापर्यंत ही सुविधा ग्राहकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
जिओमार्टचा दावा
जुलैमध्ये कंपनीने 200 शहरांमधील जवळपास 4 लाख ऑर्डर नियमितपणे डिलिव्हरी केल्या आहेत. कंपनीने हे यश दोन महिन्यांच्या कमी वेळेत प्राप्त केले आहे. त्यामुळे आम्ही आगामी काळात रिटेल व्यवसाय मजबूत करणार असल्याचा दावा जिओमार्टने केला आहे. तर दुसऱया बाजूला 2011 मध्ये बिगबास्केटचा प्रारंभ झाला आणि हे फक्त 30 शहरांमध्येच सध्या उपलब्ध आहे आणि लॉकडाऊनच्या काळात फक्त दररोज 1.6 लाख ऑर्डर बिगबास्केटने डिलिव्हरी केल्याची माहिती आहे.
फ्लिपकार्ट 70 हजार जणांना भरती करणार
फ्लिपकार्ट येणाऱया काळात 50 हजारहून अधिक किराणा व छोटय़ा दुकानदारांशी संपर्क साधून डिलिव्हरी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या कामासाठी येणाऱया काळात 70 हजार नव्या कर्मचाऱयांना कंपनीत सामावून घेतलं जाणार असल्याचे सांगण्यात येते. येणाऱया सणासुदीच्या काळात विक्रीत असणारी मागणी लक्षात घेऊन फ्लिपकार्टने योजना आखली आहे. दसरा-दिवाळीसाठी ग्राहकांपर्यंत सेवा देण्यासाठी फ्लिपकार्ट हरतऱहेचे प्रयत्न करणार असल्याचे समजते.









