निविदांची रक्कम जास्त असल्याने एकाही कंत्राटदाराचा सहभाग नाही : जाहिरात शुल्कावर पाणी सोडावे लागणार
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेचा महसूल वाढविण्यासाठी जाहिरात शुल्क वसुलीच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. पण आयोजित करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला थंडा प्रतिसाद लाभला. विविध चौकातील डिजिटल फलक, बसथांबा आणि होर्डिंगच्या माध्यमातून मिळणारा जाहिरात शुल्क वसुलीसाठी एकही कंत्राटदार महापालिकेला मिळाला नाही.
महापालिकेला विविध जाहिरात फलकांच्या माध्यमातून महसूल मिळतो. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या 39 बसथांब्यांवर जाहिरात फलक लावण्यासाठी निविदा मागविण्यात आली. वर्षाला 2 कोटी 34 लाखांचा महसूल मनपाने निश्चित केला होता. तसेच 34 बसथांब्यांवर डिजिटल फलक लावण्यात आले असून त्यावर जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी 2 कोटी 4 लाखांचा शुल्क मनपाने निश्चित केला आहे. विविध चौकात एलईडी फलक उभारण्यात आले असून कोल्हापूर क्रॉस, अशोक चौक, गोगटे चौक आणि गोवावेस अशा चार ठिकाणी असलेल्या एलईडी जाहिरात फलकांवर जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी 1 कोटी 44 लाखांचा शुल्क निश्चित केला आहे.
इमारतींवर लावण्यात येणाऱया होर्डिंगकरिता 28 लाख 83 हजार आणि रस्त्यांशेजारी असलेल्या 132 जाहिरात फलकांवर जाहिराती लावण्यासाठी 39 लाख 72 हजारांचा शुल्क निश्चित करण्यात आला आहे. तसेच लिंगराज कॉलेजसमोरील खुल्या जागेत पार्क करण्यात येणाऱया वाहनांकडून पार्किंग शुल्क आकारणीसाठी 4 लाख 40 हजारांचा शुल्क निश्चित करण्यात आला होता.
विविध माध्यमातून शुल्क वसुलीसाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. मात्र निविदांची रक्कम जास्त असल्याने निविदा प्रक्रियेत एकाही कंत्राटदाराने सहभाग घेतला नाही. निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी दि. 16 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र या प्रक्रियेत एकाही कंत्राटदाराने निविदा दाखल केली नाही. इतकी रक्कम भरण्यासाठी जाहिराती उपलब्ध नसल्याने कंत्राटदारांनी निविदा प्रक्रियेकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे जाहिरात शुल्क वसुलीसाठी महापालिकेला कंत्राटदार मिळाले नाहीत. परिणामी विविध माध्यमांतून मिळणाऱया जाहिरात शुल्कावर पाणी सोडावे लागणार आहे.









