डिजिटल बोर्ड-बसथांब्यांवरील बॅकड्रॉप फलकांवर जाहिराती झळकणार
प्रतिनिधी /बेळगाव
जाहिरात फलकांच्या माध्यमातून महापालिकेला महसूल मिळतो. पण गेल्या काही वर्षांपासून होर्डिंग लावण्यासाठी मागविण्यात आलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता पुन्हा नव्याने निविदा मागविण्यात आल्या आहेत. विविध चौकातील डिजिटल बोर्ड आणि बसथांब्यांवरील बॅकड्रॉप फलकांवर जाहिराती लावण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या
आहेत.
महसूल उत्पन्नाच्या स्त्राsतामध्ये जाहिरात फलकांचा महसूल महत्त्वाचा आहे. मात्र प्लास्टिक आणि फ्लेक्स बंदीच्या कायद्यामुळे मनपाला जाहिरात फलकाच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. जाहिरात फलक लावण्यासाठी निविदा मागविण्यात येतात. पण घातलेल्या अटींमुळे निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नाही. तसेच विविध चौकातील जाहिरात फलक हटविण्यात आल्याने कंत्राटदाराला नुकसान होत आहे. परिणामी या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही. यापूर्वी तीनवेळा निविदा मागविण्यात आल्या होत्या. पण कोणीच सहभाग घेतला नाही. तसेच स्मार्ट बसथांब्यांच्या देखभालीसह जाहिरात फलक लावण्यासाठी निविदा मागविण्यात आली होती. पण प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे महापालिकेने आता पुन्हा नव्याने निविदा मागविल्या आहेत.
विविध अटींमुळे निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळणार का?
शहरात विविध ठिकाणी स्मार्ट बसथांब्यांची उभारणी केली आहे. या ठिकाणी डिजिटल फलक तसेच बॅकड्रॉप फलक बसविण्यात आले आहेत. त्यावर जाहिरात लावण्याचे कंत्राट देण्यात येणार आहे. तसेच स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध चौकात स्मार्ट डिजिटल बोर्ड बसविण्यात आले आहेत. त्यावर जाहिराती लावण्यासाठी कंत्राट देण्यात येणार आहे. शहरातील विविध रस्त्यांशेजारी असलेल्या महापालिकेच्या जागेतील 41 फलकांवर आणि 89 खासगी जागांतील जाहिरात फलकांवर जाहिराती प्रसिद्ध करण्याकरिता कंत्राट देण्यात येणार आहे. तसेच लिंगराज महाविद्यालयासमोरील खुल्या जागेत पार्किंग शुल्क आकारणीची निविदा काढली आहे. मनपाच्या विविध अटींमुळे या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळणार का? असा मुद्दा उपस्थित होत आहे.









