ऑनलाईन टीम / मुंबई :
ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रानौत हिच्या विरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा ठोकला आहे. अभिनेता हृतिक रोशन याच्याविरोधात काहीही न बोलून मौन बाळगण्याच्या अख्तर यांच्या भूमिकेवर कंगना मागील काही काळापासून सातत्याने निशाणा साधत होती.

एका मुलाखतीत ती अख्तर यांच्याविषयी म्हणाली होती की, एकदा जावेद अख्तर यानी मला घरी बोलावले होते. राकेश रोशन आणि त्यांचे कुटुंबीय हे सारे मोठे व्यक्ती आहेत असे देखील ते म्हणाले होते. तू त्यांची मदत घेतली नाहीस तर तुझ्याकडे आणखी कोणताच पर्याय नसेल. ते तुला कारागृहात टाकतील. तुला आत्महत्या करावी लागेल’. हे खुद्द जावेद अख्तर यांचेच शब्द असल्याचे तिने स्पष्ट केले. हृतिकची माफी मागण्यावाचून आपल्याकडे कोणताही पर्याय नसल्याचे सांगताना ते आपल्यावर प्रचंड ओरडले होते असा गौप्यस्फोटही तिने केला होता.
अख्तर यांच्यावर करण्यात आलेल्या या आरोपांचा तिने कित्येकदा पुनरुच्चार केला आहे. किबंहुना तिच्या बहिणीनेही त्यांच्यावर टीका केली होती.
या संवेदनशील प्रकरणात माझा काहीही संबंध नसताना माझ्यावर धादांत खोटे आणि आधारहीन आरोप कंगनाने केले आहेत. यामुळे माझी विनाकारण मानहानी झाली असून मला नाहक प्रचंड मनस्ताप झाला आहे, त्यामुळे कंगनावर फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी जावेद अख्तर यांनी या दाव्यामध्ये केली आहे. आयपीसी कलम 499 आणि 500 नुसार अब्रुनुकसान केल्याचा खटलाही दाखल करण्याची मागणी जावेद अख्तर यांनी कोर्टाकडे केली आहे.









