सातारा/प्रतिनिधी
कोरोनामुळे यात्रा, जत्रा यांना मनाई असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करत जावळी तालुक्यात अगोदरच कोरोनाचा आकडा वाढत असताना ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या कृपेने वालुथ येथील सरपंचांने यात्रा भरवली. गावात दि. 21 रोजी रात्री छबिना मिरवणूक काढली. या यात्रेचा छबिना निघण्यापूर्वी पोलिसांना कल्पना दिली होती. तरीही हम करे सो कायदा याप्रमाणे रेटून सरपंचांने कायदा धाब्यावर बसवला. तसा तक्रार अर्ज ही जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे केला आहे.
जावळी तालुक्यात कोरोनाच्या शिरकावामुळे प्रशासन वेगवेगळ्या सूचना देत आहे. मात्र, त्या सूचनांचे पालन होत नसल्याचे दिसत आहे. वालुथ (ता. जावळी) ची ग्रामदैवत यात्रा दि. 21 व 22 रोजी होती. जगावर आलेले महामारीचे आलेले संकट टाळण्यासाठी कोणत्याही स्वरूपाचे धार्मिक, वैयक्तिक, घरगुती व शासकीय कार्यक्रम करू नये म्हणून शासनाने जमावबंदी आणि लॉक डाऊन केले आहे. यात्रे निमित्ताने ग्रामस्थांनी काळजीपोटी दि. 20 रोजी मंदिराना कुलूप लावले होते. दि.21रोजी रात्री 9 वाजता सरपंच समाधान पोफळे यांनी मंदिरांची कुलूपे काढली. ग्रामस्थांनी दर्शनास यावे असे त्यांनी लाऊडस्पीकर वरून आवाहन केले.
रात्री 12 वाजता देवाच्या पालखी निघणार असून सहभागी व्हा असे ही आवाहन केले.त्यानंतर गावातील महिला, पुरूष दर्शनास जाऊ लागले.रात्री 10.30वाजता करहर पोलीस चौकीचे हवालदार दत्तात्रय शिंदे हे राउंडला आले असता त्यांना ग्रामस्थांनी सरपंचानी मंदिर उघडल्याचे सांगितले. तर शिंदे यांनी तशी तक्रार दिली तर मंदिर बंद करायला सांगतो असा त्यांनी अजब सल्ला दिला. तेव्हा त्यांना नागरिकांनी तक्रार कशाला हवी तुम्हाला मंदिर उघडे दिसते आहे तुम्ही मंदिर बंद करू शकता अशी विनंती केली. शिंदे यांनी सरपंचाना फोन करण्याचा बहाणा केला. फोन लागत नसल्याचे सांगत एका नागरिकाचा फोन घेऊन सरपंच तुमच्याबाबत तक्रार असल्याचे सांगितले. सरपंचांना दरवाजे बंद करण्यास सांगत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवतो असे सांगितले.
रात्रभर कोणते ही कार्यक्रम होणार नाही याची काळजी घेतो असेही त्यांनी सांगितले.तरी देखील मध्यरात्री 2:15 वाजता सरपंचांनी आदेशाचा भंग करून मंदिरांचे कुलूप काढून पालखीची सजावट केली. त्यांच्यासोबत ज्ञानेश्वर धोंडिबा पोफळे, भीमराव बबनराव पोफळे, प्रकाश बाजीराव पोफळे, संजय गणपत चव्हाण, नामदेव वामन पोफळे, राजेंद्र शंकर पोफळे आदी उपस्थित होते. त्यानंतर सरपंचांनी मोबाईलवरून आरतीला येण्याचा आग्रह केला. काही नागरिक गेले असता मंदिराच्या बाजुला पालखी जवळ 25 जणांचा समुदाय होता. पालखी मिरवणूक काढण्याच्या तयारीत असल्याचे दिसले. विरोध केला तरीही पालखी मिरवणूक काढली.ग्रामस्थांच्या जिवितास धोका निर्माण केला आहे. ग्रामपंचायतीने बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार आला असेल.हवालदार शिंदे यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करणाऱ्यावर नेमकी काय कारवाई होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अगोदरच जावळी तालुका रेड झोनच्या वाटेवर असताना नियमांची पायमल्ली करून इतरांच्या जीविताशी खेळणाऱ्या कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होऊ लागली आहे.








