कुडाळ / प्रतिनिधी :
जावली तालुक्यातील एका 65 वर्षीय वृद्धाने 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरी करत तिचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली. कुडाळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
मेढा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलीच्या डाव्या हाताला धरून जबरदस्तीने जवळील शेतातील छपरात नेले. त्या वेळी पीडित मुलीची सोबत असलेली मैत्रीण तेथून पळून गेली. तेव्हा आरोपीने पीडित मुलीवर बळजबरी केल्याचा आरोप आहे. पीडित मुलगी जोरजोरात ओरडल्याने आरोपी तेथून पळून गेला. त्यानंतर पीडित मुलीच्या आजीच्या तक्रारीवरुन नराधम वृध्दाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. जावळी तालुक्यात गेल्या सहा महिन्यात तीन वेळा अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्याने जिल्ह्यात मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नमूद गुन्ह्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल खराडे यांनी भेट दिली असून, सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल माने अधिक तपास करीत आहे.