एक दुचाकीस्वार अत्यवस्थ, अरुंद रस्ते व खचलेल्या साईड पट्टय़ामुळे घडला अपघात
वार्ताहर/ कुडाळ
कुडाळ- मेढा रोडवर रविवारी दुपारी एकच्या सुमारास आलेवाडी (ता. जावळी) येथून कुडाळकडे येणारी दुचाकीवरून पांडुरंग सदाशिव पवार (वय 44 रा. आलेवाडी, ता. जावळी) आलेवाडीवरून कुडाळला जात असतानाच अरुंद रस्ता व साईडपट्टी नसल्याने गाडी रस्त्याच्यालगत खाली घसरल्याने त्याच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद कुडाळ पोलीस स्थानकामध्ये झाली आहे.
त्याचबरोबर कुडाळ पाचगणी रस्त्यावर सायंकाळी चारच्या सुमारास पाचगणीवरून स्प्लेंडरवरुन येताना ओमकार शंकर गुरव (रा. वालुथ ता. जावली) याची एसटी बसला समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात ओमकार गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय सोमर्डी येथे नेण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी सातारा क्रांतिसिंह नानासाहेब पाटील रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, एकाच दिवशी मेढा कुडाळ व कुडाळ पाचगणी या मुख्य रस्त्यावर झालेला अपघात अरुंद रस्त्यांमुळे झाले असल्याची स्पष्ट झाले आहे.
दोन्ही अपघाताची नोंद करहर पोलीस स्थानक व कुडाळ पोलीस स्थानकामध्ये झाली आहे. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल शिंदे व हेडकॉन्स्टेबल बाबर करत आहेत.








