पोटनिवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपला एक जागा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कर्नाटकातील 224 जागांव्यतिरिक्त चार राज्यांतील एक लोकसभा आणि 4 विधानसभा जागांचे निकालही शनिवारी जाहीर झाले. पंजाबमधील जालंधर लोकसभा मतदारसंघात आम आदमी पक्षाने (आप) विजय मिळवला. ही जागा त्यांनी काँग्रेसकडून हिसकावून घेतली. जालंधर व्यतिरिक्त उत्तर प्रदेशातील दोन जागांपैकी एक भाजपने आणि दुसरी अपना दल (एस) ने जिंकली आहे. याशिवाय ओडिशातील झारसुगुडा मतदारसंघातून बिजू जनता दल (बीजेडी) आणि मेघालयातील सोहियोंग जागेवरून युडीपीने बाजी मारली आहे.
आम आदमी पार्टीचे (आप) सुशील कुमार रिंकू यांनी जालंधर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या कर्मजीत कौर चौधरी यांचा 58 हजार 691 मतांच्या फरकाने पराभव केला. रिंकू यांना 3,02,279 तर चौधरी यांना 2,43,588 मते मिळाली. या जागेवरून भाजपचे इंदर इक्बाल सिंग अटवाल हे तिसऱ्या आणि अकाली दल-बसपा युतीचे डॉ. सुखविंदर सुखी चौथ्या क्रमांकावर राहिले. त्याचवेळी काँग्रेसकडून ही जागा हिसकावून घेतल्यानंतर आम आदमी पक्षाला लोकसभेत एक खासदारही मिळाला.
उत्तर प्रदेशातील रामपूरच्या स्वार मतदारसंघातून भाजप-अपना दल (एस) उमेदवार शफीक अहमद यांनी समाजवादी पक्षाच्या (एसपी) अनुराधा चौधरी यांचा 8 हजार 724 मतांनी पराभव केला. आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांनी विधानसभा सोडल्यामुळे स्वारची जागा रिक्त झाली होती. दुसरीकडे, मिर्झापूरच्या छानबे मतदारसंघातून भाजप-अपना दल (एस) उमेदवार रिंकी कोल यांनी समाजवादी पक्षाच्या कीर्ती कोल यांच्यावर 9 हजार 587 मतांनी आघाडी घेतली. अपना दल (एस) आमदार राहुल कोल यांच्या निधनानंतर छानबे मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती.
ओडिशात बीजेडी 48 हजार मतांनी विजयी
ओडिशातील झारसुगुडा विधानसभा मतदारसंघात बिजू जनता दलाच्या (बीजेडी) उमेदवार दीपाली दास यांनी विजय मिळवला आहे. 29 जानेवारी रोजी आरोग्य मंत्री नाबा किशोर दास यांच्या हत्येनंतर ही जागा रिक्त झाली होती. आता त्यांची मुलगी दीपाली 48 हजार 721 मतांनी विजयी झाली आहे. भाजपचे उमेदवार टंकधर त्रिपाठी यांना 58,384 मते मिळाली तर दीपाली दास यांना 1,07,003 मते मिळाली. तर काँग्रेसचे उमेदवार तऊण पांडे 4,496 मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
मेघालय-सोहियोंग जागेवर युडीपीची बाजी
मेघालयातील सोहिओंग विधानसभा मतदारसंघातून युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीचे (युडीपी) उमेदवार सिंशार कुपर रॉय विजयी झाले आहेत. त्यांनी नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) च्या सॅमलिन यांचा 3,422 मतांनी पराभव केला. सिंशार यांना 16,679 तर मलंगियांग यांना 13,257 मते मिळाली. तर काँग्रेसच्या उमेदवार खर्जना यांना 1,762 मते मिळाली. या जागेवर 91.39 टक्के मतदान झाले. फेब्रुवारी-मार्चमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी युडीपीचे एचडीआर लिंगडोह यांचे निधन झाल्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक झाली.









